मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे : प्रा. संदीप साठे 

प्रशांत चवरे
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

भिगवण (पुणे) : मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने मराठी माणसाची माय आहे. या भाषेमध्ये मराठी मनाचे व संस्कृतीचे प्रतिबिंब दिसुन येते. एकविसाव्या शतकामध्ये विविध भाषांच्या आक्रमणामुळे मराठी भाषेचा प्रभाव कमी होतो की काय अशी धास्ती मराठी माणसामध्ये दिसुन येते. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम यांच्या सारख्या संताचा वारसा लाभलेली मराठी भाषा कधीही अडचणीत येणार नाही. आपल्या देशामध्ये दक्षिणेतील काही भाषांना अभिजात भाषांचा दर्जा मिळाला आहे. मोठा इतिहास असलेल्या मराठी भाषेला सुध्दा अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे असे मत प्रा. संदीप साठे यांनी व्यक्त केले.

येथील कला महाविद्यालयांमध्ये मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रज्ञा लामतुरे होत्या. प्रा. पदमाकर गाडेकर,प्रा. शाम सातर्ले, प्रा. उज्वला खानावरे, प्रा. निलेश जाधव उपस्थित होते. प्रा. साठे पुढे म्हणाले, मराठीमध्ये वि.वा. शिरवाडकर, वि.स, खांडेकर, भालचंद्र नेमाडे, प्र.के. अत्रे, विठ्ठल वाघ आदींसारख्या महान साहित्यिकांनी विपुल लेखन केले आहे. तरुण पिढीला मराठी साहित्याची गोडी लावल्यास त्यांच्या व्यक्तीमत्वाच्या विकासाबरोबरच मराठी भाषेचेही संवर्धन होण्यास मदत होईल.

कार्यक्रमाच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा लामतुरे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेच्या विकासासाठी पहिला ज्ञानकोश तयार केला. महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर पहिले मुख्यमंत्री य़शवंतराव चव्हाण यांनीही मराठी भाषेच्या विकासासाठी मोठे योगदान दिले. त्यानंतर मात्र भाषेच्या विकासाकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसुन येते. अलीकडे इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असल्यामुळे शालेय मुलांमध्ये मराठी भाषेच्या वापर कमी झाल्याचे दिसुन येत आहे. शहरी भागातील मुलांचा मराठी भाषेचा शब्दसंग्रह चिंता करण्याइतपत कमी झाला आहे. इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये सुध्दा मातृभाषा असलेल्या मराठी भाषेकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

मराठी भाषेच्या विकासासाठी शासकीय तसेच व्यक्तीगत पातळीवरुनही प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास भाषेच्या विकासासाठी पुरक वातावरण निर्माण होईल. यावेळी प्रा. सुरेंद्र शिरसट यांनी मराठी भाषेची ऐतिहासिक पार्श्वभुमी विषद केली. प्रास्ताविक डॉ. प्रशांत चवरे यांनी केले सुत्रसंचालन प्रा. धनाजी मत्रे यांनी केले तर आभार प्रा. बाळासाहेब खरात यांनी मानले.

Web Title: Marathi news pune news bhigwan marathi language day