औषध विक्रेत्यांना लुटतोय तोतया 'ड्रग इन्स्पेक्टर'

सलील उरुणकर
सोमवार, 12 मार्च 2018

औषध विक्रेत्यांनी बनावट फोन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर विश्‍वास ठेवू नये. ‘एफडीए’कडून असे दूरध्वनी केले जात नाहीत. ज्यांची फसवणूक झाली आहे, त्या विक्रेत्यांनी रीतसर पोलिसांत तक्रार करावी.
- विद्याधर जावडेकर, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन, पुणे विभाग

पुणे - ‘‘मी मुंबईच्या ड्रग ऑफिसमधून बोलतोय... तुमच्या मेडिकलविषयी तक्रार आली आहे... त्यामुळे तुम्हाला चाळीस हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे... मुंबईवरून अधिकारी निघाले आहेत... दंड टाळायचा असेल, तर पैसे घेऊन तातडीने मुंबईला या.’’ अशा स्वरूपाचे दूरध्वनी शहर व राज्यातील अनेक औषधविक्रेत्यांना गेले काही दिवस येत आहेत. काही मेडिकल दुकानचालकांनी पैसे दिल्याचीही माहिती उघडकीस आली आहे.

काही दुकानचालकांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर हा ‘फेक कॉल’ असल्याचे स्पष्ट झाले. वारंवार धमकी देऊनही ज्यांनी पैसे देण्यास नकार दिला, अशा विक्रेत्यांना ‘मी मानसिक रुग्ण आहे,’ असे सांगून दूरध्वनी करणाऱ्याने सारवासारव केल्याचे उघड झाले आहे. हे कॉल रेकॉर्डिंग ‘सकाळ’कडे उपलब्ध आहे. याबाबत औषध विक्रेत्यांच्या झालेल्या फसवणुकीबाबत एफडीएचे सहआयुक्त (मुख्यालय) अमृत निखाडे यांच्याशी रविवारी दुपारी तीन वाजता संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी बोलण्यास असमर्थता दर्शविली.

संघटनेशी बोलून निर्णय
‘‘औषध विक्रेता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना या घटनेची माहिती देणार आहे. त्यानंतर पुढील कारवाईचे स्वरूप ठरविणार आहे,’’ अशी माहिती संबंधित औषध विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘सकाळ’शी बोलताना दिली.

७०,००० राज्यातील मेडिकल दुकाने
८००० पुणे शहर व जिल्ह्यातील दुकाने

उलगडला बनाव
शहराच्या मध्यवर्ती भागातील एका औषध विक्रेत्याला शनिवारी दुपारी
अशा स्वरूपाचा दूरध्वनी आला.

‘कारवाईसाठी अधिकारी निघाले आहेत. कारवाई टाळायची असेल, तर पैसे घेऊन ताबडतोब मुंबईला या.’ असे फोन करणाऱ्याने सांगितले.
कारवाईच्या भीतीमुळे संबंधित विक्रेत्याला त्या क्षणी काय बोलावे, हे समजले नाही. थोड्या वेळाने पुन्हा फोन आल्यानंतर विक्रेत्याने धाडस दाखवून काही प्रश्‍न विचारले. 

‘नेमक्‍या कोणत्या गोळीबद्दल तक्रार आहे आणि त्यावर काय कारवाई करणार?’ असा तपशील विचारल्यानंतर फोन करणारी व्यक्ती गडबडली. मात्र पैशासाठी तगादा सुरूच ठेवला.

‘मुंबईला येण्यास जमणार नाही,’ असे विक्रेत्याने सांगितल्यावर एका खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्याचा सल्ला संशयिताने दिला.

अखेर सायंकाळी पोलिसांत तक्रार करण्याच्या तयारीत असताना पुन्हा फोन वाजला. 

तो फोन घेतल्यानंतर संशयित व्यक्तीने ‘मी मानसिक रुग्ण आहे. अशाच प्रकारे मी गेले काही दिवस फोन करीत आहे. काही जणांनी पैसे खात्यात जमा केले आहेत; पण तुम्ही करू नका,’ असे सांगत प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला.

Web Title: marathi news pune news bogus drug inspector cheating crime