'बोन्साय नमस्ते'तून घडतेय देशी-विदेशी वामनवृक्षांचे दर्शन 

'बोन्साय नमस्ते'तून घडतेय देशी-विदेशी वामनवृक्षांचे दर्शन 

पुणे : यजुर्वेदात वर्णिलेली 'वामन तनू वृक्षादिकदा' हीच बोन्साय संस्कृती होय. मूळची ही भारतीय संस्कृती आणि कला जपान, इंडोनेशिया, चीनमध्ये विकसित झाली. मात्र, भारतातील कलाकारदेखील ही कला आवडीने जोपासत आहेत. आंबा, वड, पिंपळ, बेल आणि दीडशे वर्षांचा औदुंबर या 'वामनवृक्षांचे (बोन्साय) पंचायतनसह एक हजारांहून अधिक प्रजातींच्या वृक्षांच्या 'बोन्साय नमस्ते' प्रदर्शनातून भारतातील आयुर्वेदीय परंपरेचे; तसेच परदेशी वृक्षांच्या बोन्साय प्रतिकृतींचे दर्शन घडत आहे. 

सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर बोन्साय नमस्तेतर्फे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. भारतातच जन्माला आलेल्या कलेचे अप्रूप परदेशी नागरिकांमध्ये विशेषत्वाने जाणवते. म्हणूनच सोळा देशांतील प्रतिनिधी या पहिल्या जागतिक परिषदेला आवर्जून उपस्थित राहिले आहेत. परिषदेत राज्यभरातील कृषी व फलोत्पादन महाविद्यालयातील शिक्षक आणि अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. बोन्साय म्हणजे मोठ्या झाडाची लहान प्रतिकृती होय. यजुर्वेद आणि आयुर्वेदाने बोन्सायला विशेषत्वाने प्राधान्य दिले आहे. संत्री, पेरू, चिकू अगदी बोगनवेलचे बोन्सायही या प्रदर्शनात आहे. हजारो नागरिक हे प्रदर्शन पाहण्यासाठी उत्स्फूर्तपणे भेट देत आहेत. ज्यांना ही कला शिकायची आहे त्यांचे बोन्साय नमस्तेतर्फे स्वागत असल्याचे मत बोन्साय कलाकार प्राजक्ता काळे यांनी व्यक्त केले. 

त्या म्हणाल्या, ''वामनवृक्ष ही आपली संकल्पना आहे. जपानने त्यास कलेचे स्वरूप दिले. बोन्साय नमस्ते प्रदर्शनात अगदी हातावर, बोटावर बसतील असे बोन्साय वृक्ष आहेत. त्यांच्या उंचीनुसार त्यांचे वर्गीकरण केले आहे. अनेक प्रकारच्या प्रजातींचे देशी-विदेशी वृक्षांचे बोन्साय वृक्ष आहेत. चीन, इंडोनेशियात बोन्साय कला विकसित झाली. भारतातील तरुणांनी ही कला विकसित करावी. कारण भारतातील अनेक प्रजातींना जगाकडून मागणी आहे. बोन्सायच्या निर्यातीतून तरुणांना व्यवसाय करता येईल.'' 

हे प्रदर्शन 25 फेब्रुवारीपर्यंत सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी नऊ ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com