‘बीआरटी’ची हेळसांड

मंगेश कोळपकर
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या बस रॅपिड ट्रान्झिटची (बीआरटी) पीएमपीमध्ये हेळसांड होऊ लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली बीआरटी आता विस्कळित होऊ लागली आहे. भाडेतत्त्वावरील बसची संख्या कमी झाल्यामुळे बीआरटी मार्गांना फटका बसला असून परिणामी प्रवासी संख्याही घटली आहे. दुसरीकडे पीएमपीमधील ‘बीआरटी सेल’ही निकालात निघाला आहे.  

पुणे - शहरातील सार्वजनिक वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या बस रॅपिड ट्रान्झिटची (बीआरटी) पीएमपीमध्ये हेळसांड होऊ लागली आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील प्रवाशांमध्ये लोकप्रिय होऊ लागलेली बीआरटी आता विस्कळित होऊ लागली आहे. भाडेतत्त्वावरील बसची संख्या कमी झाल्यामुळे बीआरटी मार्गांना फटका बसला असून परिणामी प्रवासी संख्याही घटली आहे. दुसरीकडे पीएमपीमधील ‘बीआरटी सेल’ही निकालात निघाला आहे.  

शहर व पिंपरी चिंचवडमध्ये सुमारे दोन वर्षांपूर्वी बीआरटीचे सुमारे ३४ किलोमीटरचे चार मार्ग सुरू झाले आहेत. दोन्ही महापालिकांनी पायाभूत सुविधा चांगल्या पद्धतीने उभारल्यामुळे अल्पावधीतच बीआरटी सेवा लोकप्रिय झाली. बीआरटी मार्ग सुरू झाल्यावर सांगवी- किवळे मार्गावर प्रतीदिन प्रवासी संख्या ६७ हजार ८४४ वरून वाढून एक दोन महिन्यांतच ८६ हजार ६२१ झाली होती. उर्वरित तीन मार्गांवरही प्रवासी संख्या १० ते २० टक्‍क्‍यांनी वाढली होती. बीआरटी सेवेला ‘रेनबो’ सेवा असेही म्हटले होते. त्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आले होते. परंतु, सद्यस्थितीत ‘रेनबो बीआरटी’ही लयाला गेली आहे. 

भाडेतत्त्वावरील ५५३ पैकी तब्बल २०० बसची संख्या घटल्यामुळे बीआरटी मार्गावरील प्रवाशांना त्यांचा फटका बसला आहे. तसेच ५१ या मार्गांवरील बसच्या फेऱ्यांची संख्या कमी झाली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे ऐन परीक्षांच्या काळात विद्यार्थ्यांची गैरसोय होण्याची चिन्हे आहेत. 

‘‘पीएमपीमध्ये पाच ठेकेदारांच्या ५५३ बस भाडेतत्त्वावर घेण्यात आल्या आहेत. मात्र, देखभाल- दुरुस्ती आणि बसची प्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करणे आदी विविध कारणांमुळे २०० बस गेल्या दोन महिन्यांपासून मार्गावर धावणे बंद झाले आहे. त्याचा फटका बीआरटी मार्गांवरील बसच्या फेऱ्यांनाही बसला आहे,’’ असे पीएमपीचे वाहतूक विभागाचे प्रमुख डी. एम. माने यांनी सांगितले. 

प्रवासी किती घटले, हेच प्रशासनाला माहिती नाही !
बसची संख्या आणि त्यांच्या फेऱ्यांची संख्या घटल्यामुळे प्रवासी किती कमी झाले आहेत, याची विचारणा केली असता त्या बाबतची माहिती पीएमपी प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचेही दिसून आले. या बाबतचे तपशील विविध आगारांतून गोळा करावे लागतील, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पीएमपीमध्ये सुमारे दीड वर्षापूर्वी बीआरटी सेल कार्यान्वित होता. परंतु, त्यानंतर तो बंद करण्यात आला. बीआरटीसाठी स्वतंत्र अधिकारीही होता. परंतु, त्या पदाचे वर्गीकरण अन्यत्र करण्यात आले. त्यामुळे पीएमपीमध्ये बीआरटीकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.

पीएमपीचा बीआरटी सेल आता बंद आहे. परंतु, दोन्ही महापालिकांच्या मदतीने तो लवकरच सुरू करणार आहोत. त्यातून पायाभूत सुविधा आणि बसची संख्या, याबाबतचा विषय मार्गी लागेल. नव्या बस येत आहेत. त्यातून बीआरटीसाठी काही करता येईल का, यासाठी आराखडा तयार करू. बसची संख्या वाढली की प्रवाशांचीही संख्या वाढू शकते. त्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत.
- नयना गुंडे, अध्यक्ष, पीएमपी

सक्षम सार्वजनिक वाहतुकीसाठी बीआरटी आवश्‍यक आहेच. दुर्दैवाने बस संख्या कमी झाल्यामुळे प्रवासी घटले, ही वस्तुस्थिती आहे. परंतु, त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बीआरटी सेल सुरू करतानाच बीआरटीचा विस्तार या मुद्‌द्‌याचाही पाठपुरावा करणार आहे. त्यासाठी खासदार अनिल शिरोळे १७ मार्चला महापालिका आयुक्तांबरोबर बैठक घेणार आहेत. त्यात बीआरटीच्या सक्षमीकरणाचा आराखडा निश्‍चित करण्यात येईल.
- सिद्धार्थ शिरोळे, संचालक पीएमपी

Web Title: marathi news pune news brt issue