पुरंदर हवेली तालुक्यांसाठी अर्थसंकल्पातून 32 कोटी 

Vijay-Shivtare
Vijay-Shivtare

सासवड (पुणे) : पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघातील विविध कामांसाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चांगला निधी मंजूर झाल्याची माहिती पुरंदरचे लोकप्रतिनीधी व राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली. तब्बल ३२ कोटी रुपये खर्चून येथील रस्ते चकाचक केले जाणार आहेत. यात ३ राज्यमार्ग आणि ३ प्रमुख जिल्हा मार्गांचा समावेश आहे. येत्या वर्षभरात तालुक्यातील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हामार्गांनी कात टाकलेली असेल. असेही त्यांनी सांगितले. पुरंदर तालुक्यात होत असलेल्या नियोजित छत्रपती संभाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे या भागातील रस्त्यांशिवाय इतर मोठी तरतूद होत आहे, ती आणखी वेगळी असेल., असेही ते म्हणाले. 

शिवतारे यांनी याबाबत प्रसिध्दीला दिलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, बोपदेवघाटाचा संपूर्ण रस्ता सुधारला जाणार आहे. त्यासाठी १.२५ कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. घाटाच्या पुढे बोपगावपर्यंत हा रस्ता केला जाईल. कांबळवाडीपासून वीर गावापर्यंतच्या कामाचाही यात समावेश आहे. दोन्ही मिळून ४.५० कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली आहे. तोंडलपासून वीर, लपतळवाडी, मांडकी, जेऊर, नीरा रेल्वे गेट या गावांना जोडणाऱ्या राज्य मार्गासाठी ५.३० कोटी रुपये मंजूर केले आहेत.

भुलेश्वरघाटापासून माळशिरस, राजेवाडी, आंबळे, वाघापूर चौफुला, सिंगापूर, वनपुरी, उदाचीवाडी, आंबोडी आणि सासवड या गावांना जोडणाऱ्या राज्यामार्गासाठी सर्वाधिक ७ कोटी ५० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या रस्त्यावरील माळशिरस ते आंबळे आणि चौफुला ते वनपुरी हा भाग गतवर्षी डांबरीकरण करण्यात आलेला आहे. यावर्षी उर्वरित संपूर्ण रस्ता डांबरीकरण केला जाईल. या भागातील मुख्य जिल्हामार्गांपैकी खेडशिवापूर, गराडे, कोडीत, सासवड यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी ४.८० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण रस्त्याचा प्रश्न सुटेल. सासवड - सुपा रस्त्यावर कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, पिसर्वे आदी गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे काम ३ कोटी रुपये खर्चून सध्या सुरु आहे. त्यापुढे पिसर्वे, नायगाव, राजुरी, रीसेपिसेपर्यंत म्हणजेच तालुक्याच्या हद्दीपर्यंतच्या कामासाठी.. या अर्थसंकल्पात आणखी २.३७ कोटी मंजूर झालेले आहेत. 

मतदार संघांतर्गत हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती पासून फुरसुंगी, सायकरवाडी यांना जोडणाऱ्या रस्त्यासाठी अर्थसंकल्पात २ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. इमारतीच्या कामांमध्ये जेजुरी ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचारी निवासांसाठी ८१ लक्ष रुपये मंजूर झालेले आहेत. गतवर्षी सासवड ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणाला मंजुरी मिळालेली होती. या कामासाठी गेल्या अर्थसंकल्पात १५ लक्ष रुपयांची तरतूद होती. यावर्षी उर्वरित २४ लक्ष रुपयांची तरतूद झालेली असून हे कामही आता सुरुच होईल. सासवड - कापूरहोळ, जेजुरी - मोरगाव, उरुळीकांचन - जेजुरी, जेजुरी - कोळविहीरे - भोरवाडी एमआयडीसीअंतर्गत रस्ता आदी चार मार्गाबाबत लवकरच महत्वपूर्ण घोषणा केली जाईल, असेही सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com