‘केमिस्ट असोसिएशन’ची पोलिसांकडे धाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

एफडीएच्या कोणत्याही ‘ड्रग इन्स्पेक्‍टर’ची कामाची पद्धत ही फोन करून चौकशी करणारी नसते, त्यामुळे औषध विक्रेत्याला एखादा दूरध्वनी आल्यास घाबरून न जाता त्याबाबत खातरजमा करावी. तसेच, फोन करणाऱ्यांबाबत असोसिएशन, एफडीए आणि पोलिसांकडे तक्रार द्यावी.
- महेंद्र पितळिया, औषध व्यावसायिक

पुणे - अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचा अधिकारी असल्याचे भासवून शहर व राज्यातील औषध विक्रेत्यांची फसवणूक करणाऱ्या तोतया ‘ड्रग इन्स्पेक्‍टर’विरोधात ‘केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्‍ट’ने (सीएपीडी) पोलिसांकडे धाव घेतली आहे. आतापर्यंत शहरातील एकूण सहा औषध विक्रेत्यांनी त्यांना धमकावणारे दूरध्वनी आल्याची माहिती दिली. त्याआधारे असोसिएशनने पोलिसांकडे धाव घेतली आहे.

तोतया ड्रग इन्स्पेक्‍टरला पकडण्यासाठी असोसिएशनने ‘एफडीए’तील अधिकाऱ्यांनाही गळ घातली आहे. राज्यभरात असे प्रकार घडत असल्याचे लक्षात आल्यावर मुंबई एफडीए कार्यालयाशीही असोसिएशनने संपर्क साधला आहे. विक्रेत्यांना फसविणाऱ्या भामट्याला एकत्रितपणे पकडण्याचे नियोजन एफडीए आणि असोसिएशन करत असल्याची माहिती, सीएपीडीचे कार्यकारिणी सदस्य अनिल बेलकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

मुंबईतील वरिष्ठ एफडीए अधिकारी असल्याचे सांगत राज्यभरात धुमाकूळ घालणाऱ्या भामट्याची बातमी ‘सकाळ’ने सोमवारी प्रकाशित केली. त्याची दखल एफडीएचे अधिकारी आणि केमिस्ट असोसिएशननेही घेतली. औषध विक्रेत्यांच्या तक्रारींची दखल घेत असोसिएशनने पोलिस तक्रारी दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक विक्रेत्याकडून तीस ते चाळीस हजार रुपयांची मागणी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात त्या-त्या ठिकाणी तक्रारी दाखल करण्यात येणार आहेत.

पोलिसांत तक्रार करा
भामट्याकडून येणाऱ्या दूरध्वनीबाबत असोसिएशनच्या सदस्यांमध्ये चर्चा झाली. अशाप्रकारे फसवणूक होत असल्याने कठोर कायदेशीर पावले उचलली पाहिजेत. कोणत्याही व्यक्तीने, कोणत्याही अधिकाऱ्याच्या नावाने दूरध्वनी करून कारवाईची धमकी दिल्यास औषध विक्रेत्यांनी थेट पोलिस ठाणे किंवा चौकीत जाऊन तक्रार अर्ज द्यावा,’’ अशी सूचना असोसिएशनच्या सर्व सदस्यांना देण्यात आल्याचे अनिल बेलकर यांनी सांगितले. 

‘असोसिएशन’कडे आलेल्या तक्रारी
पिंपरी-चिंचवड परिसर - २
सिंहगड रस्ता परिसर - २
हडपसर, कोथरूड परिसर - २

Web Title: marathi news pune news chemist association police