अन् भिंती देऊ लागल्या स्वच्छतेचा संदेश !

दत्ता म्हसकर
सोमवार, 8 जानेवारी 2018

देशभरातील चार हजार सातशे शहरांमध्ये जानेवारी 2018 मध्ये शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण मोहिमेत जुन्नर शहराला मानांकन मिळावे, ऐतिहासिक व पर्यटननगरी असलेले जुन्नर शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरिता नगर परिषदेने कंबर कसली आहे.  शहराची लोकसंख्या ही जवळपास 25 हजार आहे.

जुन्नर : शिवजन्मभूमी अशी ओळख असलेल्या जुन्नर शहरात स्वच्छ सर्वेक्षण 2018 ला दोन महिन्यापूर्वी सुरुवात झाली. जुन्नर नगर परिषदेच्या हाकेला साद देत येथील स्थानिक कलाकारांनी या मोहिमेत स्वतःला झोकून देऊन सेवा तत्वावर भिंती रंगविण्याचे काम केल्याने त्यांच्या कुंचल्यातून निर्माण झालेली स्वच्छतेची चित्रे व संदेश यामुळे आता भिंतीच नागरिकांना व पर्यटकांना स्वच्छतेबाबत संदेश देण्याचे काम करु लागल्या आहेत.

देशभरातील चार हजार सातशे शहरांमध्ये जानेवारी 2018 मध्ये शासनाच्या माध्यमातून स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षण मोहिमेत जुन्नर शहराला मानांकन मिळावे, ऐतिहासिक व पर्यटननगरी असलेले जुन्नर शहर स्वच्छ व सुंदर दिसावे याकरिता नगर परिषदेने कंबर कसली आहे.  शहराची लोकसंख्या ही जवळपास 25 हजार आहे. जुन्नर  शंभर टक्के स्वच्छ व कचरामुक्त करणे हे प्रशासनाकरिता आव्हानात्मक असले तरी हे शिवधनुष्य पेलत शहराला केवळ नामांकन मिळावे म्हणून नाही तर शहर खर्‍या अर्थाने स्वच्छ व सुंदर बनावे याकरिता  नगरपरिषदेकडून दैनंदिन स्वच्छतेच्या कामासोबत काही नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे.

या उपक्रमांना नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी असो वा शहरातील नागरिक, कलाकार, संस्था तसेच शाळांचे शिक्षक व विद्यार्थी असो या सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.  प्रत्येकजण आपापल्या पध्दतीने यामध्ये सहभाग नोंदवत शहराला स्वच्छ व सुंदर बनविण्याकरिता खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करत आहे. नागरिकांचा हा प्रतिसाद व सकारात्मकता ही सर्वेक्षणांच्या मानांकनापेक्षा मोठी व कायम स्वरुपाची असल्याची भावना नगराध्यक्ष शाम पांडे व मुख्याधिकारी डॉ.जयश्री काटकर यांनी व्यक्त केली आहे. नगर परिषदेच्या स्वच्छता व आरोग्य विभागाच्या वतीने प्रभागवार स्वच्छतेची कामे केली जातात. तसेच ठेकेदाराच्या माध्यमातून घरोघरचा कचरा गोळा केला जात असल्याचेआरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले सार्वजनिक ठिकाणी याबाबत शहरातील मुख्य भिंती रंगविल्यास त्या उदबोधक ठरतील अशी कल्पना उदयास आली त्यास शहरातील कलाकार मंडळींनी  प्रतिसाद दिला. स्पर्धेच्या माध्यमातून भिंती रंगविण्यात येऊ लागल्या.  गावातील भिंती रंगविण्याचे काम पूर्ण झाले असून या भिंतीच आता खर्‍या अर्थाने बोलू लागल्या आहेत. नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देऊ लागल्या आहेत. यापुढील काळात भिंती रंगविण्याचे काम करत जनजागृती कायम ठेवण्याचा मानस कलाकार मंडळींनी व्यक्त केला आहे.

भिंती रंगविण्यासोबत शाळांमध्ये नगर परिषदेने मुलांकरिता सुरु केलेले विविध  उपक्रम प्रभावी ठरले आहेत. मुले आपला परिसर स्वच्छ ठेवू लागली आहेत. स्वच्छता उपक्रम व नागरिकांच्या मध्ये  जागृती हेच खरे या मोहिमेचे यश असल्याने ते मानांकनापेक्षा लाख मोलाचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Web Title: Marathi news Pune news cleaning in junnar