मेघगर्जनेसह गारांच्या पावसाची शक्‍यता

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

हिमालय, पश्‍चिम बंगाल ते मणिपूर या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जम्मू-काश्‍मीर आणि आसपासच्या भागात आणि आसामच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तराखंड ते राजस्थानमध्येही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात शनिवारी आणि रविवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. 

पुणे : छत्तीसगडचा दक्षिण भाग ते कर्नाटकचा उत्तर भाग या दरम्यान वाऱ्याची द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भाच्या काही भागातही या स्थितीचा प्रभाव राहणार आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्रासह विदर्भात बुधवारी (ता. 7) आणि गुरुवारी हवामान ढगाळ राहणार आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी गुरुवारी मेघगर्जनेसह गारांचा पाऊस होईल, असा इशारा भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिला आहे. गोव्यासह संपूर्ण राज्यात सोमवारी (ता. 5) आणि मंगळवारी हवामान कोरडे राहणार आहे. पुणे परिसरातही आकाश निरभ्र राहील, असेही सांगण्यात आले. 

हिमालय, पश्‍चिम बंगाल ते मणिपूर या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. जम्मू-काश्‍मीर आणि आसपासच्या भागात आणि आसामच्या पूर्व भागात चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. उत्तराखंड ते राजस्थानमध्येही कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. राज्यात कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात शनिवारी आणि रविवारी ढगाळ वातावरण होते. त्यामुळे उन्हाचा कडाका चांगलाच जाणवत होता. 

दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तापमानामध्ये सरासरीच्या तुलनेने उल्लेखनीय, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून आले. कोकण-गोव्याच्या काही भागातही तापमानात किंचित वाढ झाली आहे.  

Web Title: Marathi News Pune News Climate Heavy Rain will Come