फक्त स्पर्धा परीक्षांच्या मागे धावू नका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘‘फक्त स्पर्धा परीक्षांच्या मागे धावू नका. पूर्वी अन्य क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, आता त्या आहेत. फक्त नागरी सेवा क्षेत्रामधूनच समाज परिवर्तन घडविता येते असे नाही. सामाजिक क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात ‘रिक्त जागा’ (व्हेकन्सिज) आहेत,’’ असा सल्ला प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी रविवारी दिला. 

पुणे - ‘‘फक्त स्पर्धा परीक्षांच्या मागे धावू नका. पूर्वी अन्य क्षेत्रांत करिअरच्या संधी उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, आता त्या आहेत. फक्त नागरी सेवा क्षेत्रामधूनच समाज परिवर्तन घडविता येते असे नाही. सामाजिक क्षेत्रात सध्या मोठ्या प्रमाणात ‘रिक्त जागा’ (व्हेकन्सिज) आहेत,’’ असा सल्ला प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांनी रविवारी दिला. 

महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका), मुक्तांगण संस्था आणि साधना साप्ताहिकातर्फे आयोजित कार्यक्रमात भारतीय परराष्ट्र सेवेतील (आयएफएस) अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे, भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी महेश भागवत आणि भारतीय प्रशासन सेवेतील (आयएएस) अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तरुणाईशी संवाद साधला. पत्रकार निखिल वागळे यांनी त्यांची मुलाखत घेतली. ‘फाउंडेशन’चे डॉ. सुरेश तलाठी, ‘मुक्तांगण’च्या मुक्ता पुणतांबेकर आणि ‘साधना’चे विनोद शिरसाट या वेळी उपस्थित होते. 

मुळे म्हणाले, ‘‘मोठ्या प्रमाणात बदल घडविण्यासाठी ‘जनतेचे नोकर’ असलेली प्रशासकीय सेवा यंत्रणा हीच सर्वांत प्रभावी व्यवस्था आहे. मात्र, पूर्वीप्रमाणे समाजात बदल घडविण्यासाठी फक्त प्रशासकीय सेवा एवढा एकच मार्ग आहे, असे आता राहिलेले नाही. सध्या स्पर्धा परीक्षा देण्यासाठी बहुतांश तरुण-तरुणी इच्छुक आहेत; पण समाजकार्याचा कळवळा नसेल, देश अजूनही प्रचंड गरिबीत आहे याची जाणीव नसेल आणि समाजाला आपण काहीतरी देणे लागतो याची जाणीव नसेल तर कोणीही प्रशासकीय सेवेत येऊ नये.’’

भागवत म्हणाले, ‘‘समाजातील काही प्रश्‍नांसाठी ‘यंत्रणा’ जबाबदार असते. तरुण वयातील आदर्शवाद आणि वास्तव याची सांगड घालणे तुम्हाला जमले पाहिजे. सरकारी नोकरी वाटते तेवढी सोपी नसते. त्यामुळे तुमच्यातला कार्यकर्ता जिवंत ठेवून ‘कार्यकर्ता अधिकारी’ बना.’’

देशभ्रतार म्हणाल्या, ‘‘प्रशासकीय सेवेत काम करताना महिलांसमोर काही आव्हाने निश्‍चितच असतात. ‘पुरुषी मानसिकते’ने ज्याप्रमाणे पुरुषांना ग्रासले आहे, त्याचप्रमाणे त्याचा पगडा महिलांवरही दिसून येतो. आपले कर्तव्य पार पाडत असताना अधिकारी म्हणून जी जबाबदारी व अधिकार वापरायला मिळतात, तसेच समाजाप्रती आणि नागरिकांच्या भावना समजून घेण्याची जबाबदारीही असते. विकास प्रकल्पांसाठी होणाऱ्या विस्थापितांच्या पुनर्वसनाचे काम करताना या जबाबदारीची जाणीव विशेषतः होते.’’
शिरसाट यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: marathi news pune news competition exam discussion