क्रिकेट खेळतानाच त्याने मैदानावर जीव सोडला... 

सागर शिंगटे
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

पिंपरी : ''महेश क्रिकेटचा खूप चाहता होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळला आणि क्रिकेट खेळतानाच मैदानावर त्याने जीव सोडला; परंतु तो गेला आहे असे अजूनही वाटत नाही,'' अशा शब्दांत 'जयश्री पॉलिमर'चे दिवंगत अष्टपैलू क्रिकेटपटू महेश पाटील यांच्या संघ सहकाऱ्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. 

पिंपरी : ''महेश क्रिकेटचा खूप चाहता होता. अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळला आणि क्रिकेट खेळतानाच मैदानावर त्याने जीव सोडला; परंतु तो गेला आहे असे अजूनही वाटत नाही,'' अशा शब्दांत 'जयश्री पॉलिमर'चे दिवंगत अष्टपैलू क्रिकेटपटू महेश पाटील यांच्या संघ सहकाऱ्यांनी स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. 

औद्योगिक क्रीडा संघटनेमार्फत, आकुर्डी येथे आयोजित औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत गोलंदाजी करताना महेश पाटील (वय 32, रा. प्राधिकरण) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्‍याने शनिवारी निधन झाले. त्यांच्या या आकस्मिक निधनाबद्दल त्यांच्या कंपनीत आणि संघ सहकाऱ्यांत हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच्या सामन्यात उल्लेखनीय खेळाबद्दल त्यांना सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले होते. 

औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत बाद फेरीत जयश्री पॉलिमर आणि थरमॅक्‍स 'ब' यांच्यात सामना सुरू असताना वरील दुर्दैवी घटना घडली. दुसऱ्या षटकाची गोलंदाजी सुरू असताना त्यांना छातीत त्रास जाणवू लागला. त्यामुळे त्यांनी मैदान सोडले. ग्लूकॉन-डी प्यायल्यावर त्यांनी एक-दोन जणांशी मोबाईलवरून संपर्कही साधला; परंतु लगेच खाली कोसळले. इतर सहकाऱ्यांनी त्यांना प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न केला; मात्र रुग्णालयात नेईपर्यंत त्यांची प्राणज्योत मालविली. 

संघ सहकारी शेखर गोडांबे म्हणाले, ''महेश याने आदल्या सामन्यात टाटा मोटर्स 'ब' विरुद्ध खेळताना 4 गडी बाद केले होते. त्यामुळे त्याला सामनावीराच्या किताबाने गौरविण्यात आले. बाद फेरीत थरमॅक्‍स 'ब' विरुद्ध खेळतानाही त्याने 3 धावांत 2 गडी टिपले होते. या तिसऱ्या सामन्यातही सामन्याचा मानकरी ठरण्याची त्याला संधी होती; परंतु तसे होऊ शकले नाही.'' 

संघ व्यवस्थापक आणि त्यांचे निकटवर्तीय दत्ता बोराटे म्हणाले, ''महेश माझ्याशेजारी लहानपणापासून राहत होता. त्याला अंगा-खांद्यावरही खेळविले होते; परंतु त्याला अंत्यविधीसाठी माझ्या खांद्यावर न्यावे लागले. यासारखी वाईट गोष्ट कोणती असावी? त्याच्या निधनामुळे मला अजूनही व्यवस्थित झोप लागत नाही.'' 

डॉक्‍टरांचा सल्ला ऐकला असता तर... 
महेश यांना आदल्या दिवशीही छातीत दुखण्याचा त्रास उद्‌भवला होता. त्यामुळे त्यांनी डॉक्‍टरांची भेट घेतली होती. त्या वेळेस त्यांनी त्याला 'ईसीजी' काढण्याचा सल्ला दिला होता; परंतु ''उद्या मॅच संपल्यावर 'ईसीजी' काढेन', असे सांगत त्यांनी 'ईसीजी' काढण्याचे पुढे ढकलले. महेश यांच्या पश्‍चात त्यांच्या पत्नी, आई, अर्धांगवायूग्रस्त त्याचे वडील आणि 7 महिन्यांचा मुलगा, 3 ते 4 वर्षांची मुलगी आहे.

Web Title: marathi news pune news cricketer died on field Mahesh Patil