दौंडमधील बेकायदा खासगी सावकारी मोडीत काढा: सुप्रिया सुळे

प्रफुल्ल भंडारी
शनिवार, 20 जानेवारी 2018

दौंड शहरात आज (ता. १९) पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे ही मागणी केली. शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून संशयित मारेकरी तथा सहायक पोलिस उप निरीक्षक संजय शिंदे याने १६ जानेवारी रोजी तीन जणांवर एकूण दहा गोळ्या घालून त्यांना ठार केले होते.

दौंड : दौंड शहर व तालुक्यातील बेकायदा खासगी सावकारी मोडीत काढण्याची आणि संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. 

दौंड शहरात आज (ता. १९) पत्रकारांशी बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवरून संवाद साधत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे ही मागणी केली. शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून संशयित मारेकरी तथा सहायक पोलिस उप निरीक्षक संजय शिंदे याने १६ जानेवारी रोजी तीन जणांवर एकूण दहा गोळ्या घालून त्यांना ठार केले होते. खासदार सुप्रिया सुळे विश्वास नांगरे पाटील यांना म्हणाल्या, ''दौंड मधील गोळीबार प्रकरण आणि तालुक्यात फोफावलेल्या बेकायदा खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्यासह बेकायदा खासगी सावकारी मोडीत काढण्यासाठी विशेष मोहिम राबवावी. बेकायदा खासगी सावकारी प्रकरणाच्या तक्रारी आणि कारवाईसाठी स्वतंत्र जबाबदार पोलिस अधिकारी नियुक्त करावेत. त्याचबरोबर बेकायदा सावकारीच्या तक्रारींसाठी स्वतंत्र हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वित करावा. दौंड मधील गोळीबार प्रकरणानंतर तातडीने तुम्ही (विश्वास नांगरे पाटील) शहरात दाखल झाल्याने नागरिकांना एक आधार वाटत असून या प्रकरणात ठोस कारवाईची अपेक्षा असून पुढील गैरकृत्यांना देखील चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परंतु तुम्ही दौंडकडे जरा जास्त लक्ष देऊन पुन्हा अशा प्रकारच्या छोट्या - मोठ्या घटना देखील होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. गोळीबार प्रकरणाचा तपास निष्पक्ष व पारदर्शकपणे व्हावा.'' 

विश्वास नांगरे पाटील या बाबत खासदार सुप्रिया सुळे यांना म्हणाले, `` दौंड व इंदापूर तालुक्यातील बेकायदा सावकारी मोडण्याचे आदेश मी पुणे ग्रामीण पोलिस दलाच्या अधीक्षकांना दिलेले आहेत. पीडितांनी स्वतः हुन पुढे येत पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी. जे सावकार वाहने ओढून नेतात किंवा जमिनींचा कब्जा करतात त्यांच्यावर दरोड्याचे गुन्हे दाखल केले जातील. पोलिस ठाणे पातळीवर कोणत्याही अधिकार्याने जर तक्रार दाखल करून घेण्यास किंवा पुढील कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनी अधीक्षक किंवा माझ्याशी थेट संपर्क साधावा.''

Web Title: Marathi news Pune news crime in Daund