चौपट परताव्याच्या आमिषाने दुबईतील नागरिकाला गंडा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

दुबई येथे राहणाऱ्या सुनील साठे यांना 2012 मध्ये वेल्हा येथे जमिनीमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास चौपट परतावा मिळवून देऊ, असे सांगत दोन अज्ञात व्यक्ती व एका महिलेने करारनाम्यासाठी एक कोटी 36 लाख रुपये आपल्या खात्यात जमा करायला सांगितले.

पुणे : पुणे व परिसरात जमिनीमध्ये पैशांची गुंतवणूक करून चौपट परतावा मिळवून देतो, असे सांगून अनिवासी भारतीय नागरिकासह बॅंकेची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक करण्याचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन अज्ञात व्यक्तींसह एका महिलेविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. 

याबाबत कोंढवा पोलिस ठाण्यामध्ये रेखा जोशी (वय 38, रा. सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. दुबई येथे राहणाऱ्या सुनील साठे यांना 2012 मध्ये वेल्हा येथे जमिनीमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास चौपट परतावा मिळवून देऊ, असे सांगत दोन अज्ञात व्यक्ती व एका महिलेने करारनाम्यासाठी एक कोटी 36 लाख रुपये आपल्या खात्यात जमा करायला सांगितले. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा साठे यांच्या मुलास "क्‍लिअर डील मार्केट'मध्ये संचालक बनवितो, असे सांगून त्यासाठी साठे यांच्या वारजे व महंमदवाडी येथील सदनिका गहाण ठेवून एक कोटी रुपयांचे कर्ज घेऊन स्वतःच्या खात्यात जमा केले.

सदनिका गहाण ठेवताना मालमत्ता कर भरलेला नसतानाही हा कर भरल्याची खोटी कागदपत्रे बॅंकेत सादर केली. अशा प्रकारे साठे यांच्यासह बॅंकेची सव्वादोन कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे; मात्र त्यांना अद्याप अटक केली नाही. 
 

Web Title: Marathi News Pune News Crime News Dubai Person Money Double