ज्येष्ठ नाट्यसमीक्षक डॉ. मनीषा दीक्षित यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे : ज्येष्ठ नाट्यसमीक्षक आणि मराठी साहित्याच्या अभ्यासक डॉ. मनीषा दीक्षित यांचे आज दिनांक १७ फेब्रुवारी रोजी पहाटे ४ वाजता त्यांच्या राहत्या घरी अल्पशः आजाराने निधन झाले. त्या एक्काहत्तर वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात त्यांच्या आई सुषमा भट, पती उपेंद्र दीक्षित, मुलगा हृषीकेश आणि मुलगी विभावरी देशपांडे आहेत. 

मनीषा दीक्षित यांचा जन्म अमरावतीमध्ये झाला. संस्कृत भाषा आणि साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक कै. गो. के. भट यांच्या त्या कन्या. त्यांचे प्राथमिक शिक्षण गुजरातमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेज मध्ये झाले. मराठी विषयात  एमए पदवी मिळवल्यानंतर, "द्वितीय महायुद्धोत्तर काव्यसमीक्षा" या विषयावर त्यांनी पी. एच. डी. केली होती. पुण्यातील फर्गसन महाविद्यालय, पुणे विद्यापीठाचा मराठी विभाग, ललित कला केंद्र इत्यादी संस्थांमध्ये त्यांनी अध्यापन केले होते. पुणे विद्यापीठाच्या इ एम आर सी विभागात निर्मात्या म्हणूनही त्या कार्यरत होत्या.

मनीषा दीक्षित यांचा नाटक, काव्य, चित्रपट, शास्त्रीय संगीत अशा विविध क्षेत्रांचा अभ्यास होता. पुण्यातील अनेक हौशी, तरुण, नव्या जुन्या रंगाकर्मींबरोबर त्यांचा नियमित संपर्क होता. नवनवीन कलात्मक उपक्रमांना त्यांचा नेहमीच पाठिंबा असे. लोकसत्ता, इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांसाठी त्या नियमित नाट्य समीक्षण लिहीत असत.

त्यांच्या रुजवण, निगराणी, पूल, डायरी, या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या आहेत. "ओवी ते हायकू" या मराठी काव्यविश्वाचा मागोवा घेणाऱ्या कार्यक्रमाचे त्यांनी लेखन केले होते. मराठी कविता आणि त्यातील अनेकपदरी अनुभव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या तरुणाईपर्यंत पोहोचावेत यासाठी या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी कष्ट घेतले होते. पुण्यातील इंडियन मॅजिक आय, कलाछाया, आय ए पी ए आर तसेच अनेक शैक्षणिक व सांस्कृतिक संस्थांशी त्या संबंधित होत्या.

Web Title: Marathi news pune news critics manisha dixit expired