नव्या कलाकारांनी स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करावा - राजेभोसले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

दादा कोंडके यांच्या नावाने पुरस्कार मिळाल्यामुळे माझ्या कलेचे चीज झाले. लीला गांधी, जयमाला इनामदार यांच्यासोबत मी काम केले. पण, दादांसोबत काम करण्याची संधी मिळाली नाही, ही खंत आहे.
- राजश्री काळे-नगरकर, अभिनेत्री

पुणे - ‘‘शाहीर दादा कोंडके यांचे चित्रपट हाउसफुल्ल होत होते. मराठी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजविणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. परंतु सध्या ग्रामीण भाग चित्रपटापासून दूर होत चालला आहे. म्हणूनच नव्या कलाकारांनी दादा कोंडके यांच्याप्रमाणे स्वतःचा प्रेक्षकवर्ग तयार करावा,’’ असे मत अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी व्यक्त केले. 

शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठान व दादा कोंडके मित्र परिवार आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अभिनेत्री लीला गांधी, जयमाला इनामदार, सुधीर गाडगीळ, जितेंद्र गोळे उपस्थित होते. अभिनेत्री राजश्री काळे- नगरकर (शाहीर दादा कोंडके कला गौरव पुरस्कार), योगेश मालखरे (सामाजिक गौरव), मारुती गोळे (सांस्कृतिक गौरव) व वैष्णवी मांडेकर (क्रीडा गौरव), एल. बी. माने (तंत्रज्ञ गुणगौरव) यांना या कार्यक्रमात पुरस्काराने गौरवण्यात आले. 

राजेभोसले म्हणाले, ‘‘एखादाच चित्रपट सध्या प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवितो; परंतु शेकडो चित्रपट आठवडाभरही चालत नाहीत. नव्या कलाकारांना पदार्पणातच महत्त्वाच्या भूमिकांची अपेक्षा असते; पण सद्यःस्थितीत मराठी कलाकारांना प्रेक्षकवर्ग राहिलेला नाही. प्रेक्षकवर्ग आपल्याकडे कसा वळेल, यादृष्टीने नव्या कलाकारांनी प्रयत्न करावेत.’’

Web Title: marathi news pune news dada kondake kala gaurav award meghraj rajebhosale