'दुग्धजन्य निर्मिती' कारखान्याला स्थानिकांचा विरोध

रामदास वाडेकर
गुरुवार, 18 जानेवारी 2018

आंदर मावळातील २४  गावांतील महिलांना संघटित करून या कंपनीची स्थापना केली आहे,  दुग्धव्यवसायिकांसाठी विशेष करून धरणग्रस्त व महिला वर्गासाठी दूध डेअरी प्रकल्प सुरू करण्याच्या हेतूने या भागातील सुमारे एक हजार धरणग्रस्त महिलांना सभासद करून घेतले आहे. या प्रकल्पासाठी  बोरवली येथे  सुमारे दोन एकर जागा ही खरेदी करण्यात आली आहे, मात्र ऐनवेळी ही दूध डेअरी सभासदांना कोणतीही पूर्व कल्पना न देता टाटा प्रशासनाने टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक क्षेत्रात हलवण्याचा घाट घालून त्याचे भूमिपूजन गुरुवारी ( दि. १८ ) रोजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

टाकवे बुद्रुक : टाटा पॉवर व एएलसी कंपनीच्या पुढाकाराने महिलांनी स्थापन केलेल्या मावळ दूध उत्पादक कंपनीने 'दुग्धजन्य निर्मिती 'चा कारखाना ठोकळवाडी धरणाच्या हद्दीत सुरू करावा अशी मागणी धरणग्रस्त शेतकरी व लोकप्रतिनिधींनी केली आहे. या कारखान्याचे भूमीपूजन टाकवे बुद्रुक औद्योगिक क्षेत्रात करण्याच्या निर्णयाला स्थानिकांनी विरोध दर्शविला आहे. 

आंदर मावळातील २४  गावांतील महिलांना संघटित करून या कंपनीची स्थापना केली आहे,  दुग्धव्यवसायिकांसाठी विशेष करून धरणग्रस्त व महिला वर्गासाठी दूध डेअरी प्रकल्प सुरू करण्याच्या हेतूने या भागातील सुमारे एक हजार धरणग्रस्त महिलांना सभासद करून घेतले आहे. या प्रकल्पासाठी  बोरवली येथे  सुमारे दोन एकर जागा ही खरेदी करण्यात आली आहे, मात्र ऐनवेळी ही दूध डेअरी सभासदांना कोणतीही पूर्व कल्पना न देता टाटा प्रशासनाने टाकवे बुद्रुक येथील औद्योगिक क्षेत्रात हलवण्याचा घाट घालून त्याचे भूमिपूजन गुरुवारी ( दि. १८ ) रोजी करण्याचा निर्णय घेतला होता. 
 याविरोधात धरणग्रस्त शेतकरी महिला संतप्त झाल्या असून त्यांनी टाटा प्रशासनाच्या या निर्णयाला विरोध दर्शविला आहे. तसे लेखी निवेदनही टाटा प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. यावर अंदर मावळातील सर्व ग्रामपंचायत सरपंच, महिला सभासदांच्या सह्या केल्या आहेत अशी माहिती शिवसेना तालुका प्रमुख राजू खांडभोर यांनी दिली.

टाटा प्रशासनाने शंभर दीडशे वर्षांपूर्वी अंदर मावळातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सुमारे २५०० हे जमीन भूसंपादन करून ग्रामपंचायत वडेश्वर च्या हद्दीत धरण बांधले. मात्र आजही येथील धरणग्रस्तांना कोणत्याही प्रकारचा मोबदला वा त्यांचे पुनर्वसन झाले नाही. मावळ दूध डेअरी प्रकल्प हा त्यादृष्टीने येथील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे मात्र तो अंदर मावळात झाला तरच. टाटा प्रशासनाने प्रथम बोरवली येथे हा प्रकल्प उभारायचा असे सर्वानुमते ठरले मात्र नंतर हा प्रकल्प टाकवे येथील औद्योगिक क्षेत्रात हलवून धरणग्रस्त शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. हा प्रकल्प टाकवे येथे उभारल्यास अंदर मावळातील धरणग्रस्त शेतकरी व महिला सभासदांचा त्यावर अधिकार राहणार नाही. तसेच शासनाच्या धोरणा प्रमाणे महिला संचालक मंडळ हे तीन ते चार वर्षांनी बदलणार असून सदरची दूध डेअरी प्रकल्प हा अंदर मावळातील धरणग्रस्त शेतकरी दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवावर चालणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प अंदर मावळातून हलवू नये अशी जोरदार मागणी होत आहे.

तसेच अंदर मावळातील शेअर सभासद महिला व संचालिका महिला ह्या ग्रामीण भागातील महिला असून या भोळ्या भाबड्या महिलांच्या सभासद शुल्कातून बोरवली येथे जागा घेऊन महिलांची फसवणूक केली आहे. मावळ डेअरी प्रकल्प टाकवे येथे केल्यास अंदर मावळातील सर्व ग्रामपंचायती, ग्रामस्थ, महिला सभासद आदींच्या वतीने तसेच अंदर मावळच्या जनतेच्या वतीने तीव्र विरोध दर्शविला आहे. शिवाय टाटा प्रशासन त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Web Title: Marathi news Pune news dairy project