तीन वर्षांत ६० बळी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

पुणे - वाहतूक नियम बाजूला सारत माल वाहून नेणारी अवजड वाहने... भरधाव येणाऱ्या मोटारी (कार), दुचाकी... जागा मिळेल तेथून कशीबशी वाट काढणारे पादचारी... प्रचंड वर्दळीच्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ही जीवघेणी परिस्थिती अधिक धोकादायक होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांत ६० हून अधिक पादचारी, वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.

पुणे - वाहतूक नियम बाजूला सारत माल वाहून नेणारी अवजड वाहने... भरधाव येणाऱ्या मोटारी (कार), दुचाकी... जागा मिळेल तेथून कशीबशी वाट काढणारे पादचारी... प्रचंड वर्दळीच्या कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ही जीवघेणी परिस्थिती अधिक धोकादायक होत आहे. त्यामुळे या रस्त्यावरील अपघातांची मालिका सुरूच आहे. गेल्या तीन वर्षांत ६० हून अधिक पादचारी, वाहनचालकांना जीव गमवावा लागला आहे.

बेशिस्त वाहनचालकांच्या गर्दीतील कात्रज चौकातून कोंढव्याच्या दिशेने जाताना माल वाहून नेणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होते. ती राजेश सोसायटी चौकापर्यंत कायम राहते. परिणामी, या भागात पादचाऱ्यांना रस्ता ओलांडणे काय? पाय ठेवणेही अशक्‍य होते. त्यातच छोटी-मोठी वाहने जागा मिळेल, तेथून घुसत असल्याने कोंडीत भर पडत असल्याचे दिसून आले. ही कोंडी फोडण्यासाठी वाहतूक पोलिसांची होणारी धावपळ दिसून येत असली, तरी तिचा परिणाम मात्र कुठेही दिसत नाही. काही अंतर पुढे गेल्यानंतर गोकूळ नगर चौकात वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसतात; त्या अगदी शत्रुंजय मंदिर परिसरापर्यंत. त्यामुळे किमान तासभर तरी वाहनचालकांना ताटकळत 
राहावे लागते.

पोलिसांचा निष्काळजीपणा; रस्त्याची दुरवस्था
सुरक्षिततेसाठी गोकुळनगर चौक ते खडी मशिन चौकापर्यंत दुभाजक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे या भागात वाहनांना शिस्त लागत असल्याचे दिसून आले. मात्र कात्रज चौक ते गोकूळनगरपर्यंत दुभाजक नसल्याने वाहतूक विस्कळित होते. तसेच सुरक्षिततेच्या उपाययोजना न करता माल वाहतूक केली जाते, त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने येथील नागरिकांनी सांगितले. वाहतूक पोलिस अशा वाहनचालकांवर कठोर कारवाई करीत नसल्याची तक्रारही त्यांनी केली आहे. या रस्त्याची काही ठिकाणी दुरवस्था झाली असून, त्याची दुरुस्ती होत नसल्याचेही आढळून आले.

धोकादायक उतार अन्‌ वळण
उतार आणि वळणामुळे कोंढवा स्मशानभूमीजवळ वाहतूक धोकादायक होते. त्यामुळे पादचारी रस्ता ओलांडण्याचे धाडसच करीत नाहीत. वेगवेगळ्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे खडी मशिन चौकात जीवघेणी परिस्थिती अनुभवावी लागते. त्यात चौकातील अतिक्रमणांमुळे जीव मुठीत घेऊन चालावे लागते.

रस्त्याच्या कामाचे राजकारण
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधील सर्वाधिक रुंद असलेल्या कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाला गती देण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्या. पहिल्या निविदा रद्द झाल्यानंतर सुमारे २१६ कोटी रुपयांच्या फेरनिविदा काढण्यात आल्या. त्यातील ठेकेदार कंपनीबाबत आक्षेप घेण्यात आल्याने ही प्रक्रिया पुन्हा रखडण्याची चिन्हे आहेत. पादचारी, वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्याचे काम लवकर सुरू करणे अपेक्षित असतानाही याचे राजकारण करीत कामात अडथळे आणले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Web Title: marathi news pune news death in accident by road