वीजबिलासाठी वापरा ऑनलाइन सुविधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - महावितरणकडे जिल्ह्यातील सुमारे १ लाख ७० हजार ग्राहक धनादेशाद्वारे (चेक) वीजबिलाचा भरणा करीत असून, त्यापैकी सुमारे साडेतीन हजार ते चार हजार धनादेश विविध कारणांमुळे ‘बाऊन्स’ (वटत नाही) होत आहेत. त्याचा फटका संबंधित ग्राहकाला सोसावा लागत असल्याने ग्राहकांनी ऑनलाइन सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे. 

धनादेन वटला नाही तर ३५० रुपये दंड होतो. धनादेश अंतिम मुदतीच्या तारखेनंतर वटल्यास पुढील बिलात येणारी थकबाकी, वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारवाईला ग्राहकाला सामोरे जावे लागते. वीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्‍यक आहे. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते. परंतु अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास तीन ते चार दिवस लागतात. त्यामुळे मुदतीनंतर वीजबिलाचा भरणा झाल्यास संबंधित ग्राहकांना पुढील बिलात थकबाकी रक्‍कम दिसते. धनादेश बाउंस झाला तर दंडासह वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

बहुतांश थकबाकीदार वीजग्राहकांनी दिलेले चेक हे बाउंस व्हावेत अशा हेतूनेच व जाणीवपूर्वक दिलेले असतात, असे महावितरणच्या विश्‍लेषणात दिसून आले आहे.

घरबसल्या भरा वीजबिल 
महावितरणचे वीजबिल  www.mahadiscom.in या वेबसाइट, मोबाईल ॲप किंवा ईसीएसद्वारे भरण्याची सोय उपलब्ध आहे. इंटरनेट व मोबाईल ॲपच्या माध्यमातून पुणे परिमंडलातील सुमारे ७ लाख ४० हजार वीजग्राहक सुमारे १४० कोटी रुपयांचा वीजबिल भरणा दरमहा करीत आहेत. तसेच ईसीएसद्वारे देयके भरण्यासाठी सुमारे सव्वादोन लाख वीजग्राहकांनी नोंदणी केलेली असून, घरबसल्या दरमहा सुमारे २० कोटी रुपयांचा वीजदेयकांचा भरणा ते करीत आहेत. त्यामुळे धनादेशाऐवजी वीजग्राहकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

Web Title: marathi news pune news electricity bill use online facility