बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा

प्रा. प्रशांत चवरे
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

पोलिस कारखान्याकडे येत असल्याची माहिती मिळताच आरोपींनी नोटा जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेकीमध्ये पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे व बापू हडागळे जखमी झाले आहेत.

भिगवण : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर डाळज क्र. ३ (ता. इंदापूर) येथे संशयित व्यक्तीस बनावट नोटांच्या बॅगसह ताब्यात घेतल्यानंतर त्याकडे केलेल्या कसून चौकशीत माढा (जि. सोलापूर) तालुक्यातील टेंभूर्णी जवळील टाकळी येथे बनावट नोटांचा कारखाना असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी, भिगवण पोलिस, इंदापूर पोलिस व टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकत तेथून बनावट नोटा तयार करण्याच्या सामग्रीसह दोघांना अटक केली आहे. 

छापा टाकण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर केलेल्या दगडफेकीमध्ये दोन पोलिस जखमी झाले आहेत. याबाबत टेंभूर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी वशिष्ठ कुंडलिक जाधव (रा. टाकळी,ता.माढा,जि.सोलापूर) व बडतर्फ पोलिस हवालदार रवी वसंत पाटील (रा. जळगांव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. डाळज क्र.३(ता.इंदापूर) येथे एक संशयित व्यक्ती बनावट नोटांसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे व बापू हडागळे यांनी घटनास्थळी पाळत ठेवली असता त्यांना संशयित व्यक्ती बनावट नोटांच्या बॅगसह आढळून आला.

त्यास ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने टेंभूर्णी (ता.माढा. जि. सोलापूर) जवळील टाकळी येथे बनावट नोटांचा कारखाना असल्याची माहिती दिली. त्यानंतर बारामती उपविभागीय अधिकारी बापु बांगर, भिगवण पोलिस ठाण्यातील श्रीरंग शिंदे, बापु हडागळे, तसेच भिगवण, इंदापूर व टेंभूर्णी पोलिसांनी संयुक्तरित्या टाकळी येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छापा टाकला.

पोलिस कारखान्याकडे येत असल्याची माहिती मिळताच आरोपींनी नोटा जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. तसेच पोलिसांवर दगडफेक केली. दगडफेकीमध्ये पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे व बापू हडागळे जखमी झाले आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. घटनास्थळी पोलिसांना बनावट नोटा तयार करण्याचे स्कॅनिंग मशिन्स, नोटा छापण्याचे मशिन नोटांसाठी लागणारा कागद याशिवाय तयार केलेल्या ५० रुपयांच्या १० हजार किमतीच्या बनावट नोटा, जाळलेल्या नोटा आदी साहित्य आढळून आले.

बनावट नोटा छापण्याच्या कारखान्याचे प्रकरण गंभीर असून, या प्रकरणांमध्ये आणखीही आरोपी सहभागी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याबाबत बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर म्हणाले, बनावट नोटांचे वितरण करणाऱ्या संशयित व्यक्तीबाबत पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यावरुन अधिक तपास करुन माढा तालुक्यातील टाकळी येथील बनावट नोटांच्या कारखान्यावर छाटा टाकून नोटा छापणारा व नोटांचे वितरण करणारा अशा दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आहे.

हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यामध्ये आणखी काही आरोपी गुंतले असल्याची शक्यता आहे. याचा पुढील तपास पोलिस घेत आहेत.

Web Title: Marathi News Pune news Fake Notes production police raid