मुलासमोर झाडल्या गोळ्या; रिअल इस्टेट व्यावसायिकाचा मृत्यू

अनिल सावळे
रविवार, 14 जानेवारी 2018

वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांना लागल्या. यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

पुणे : रिअल इस्टेट व्यावसायिक देवेंद्र शहा (वय 56) यांच्यावर दुचाकीवरून आलेल्या अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना डेक्कन परिसरातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक सातमध्ये शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली.

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. अतिरिक्त पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, उपायुक्त बसवराज तेली यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोचले. सर्वत्र नाकाबंदी करण्यात आली असून, पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.

वरिष्ठ निरीक्षक अजय कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्लेखोरांनी शहा यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या त्यांना लागल्या. यात ते गंभीर जखमी झाल्यामुळे त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रात्री एकच्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

शहा हे प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक सातमध्ये सायली अपार्टमेंटमध्ये राहतात. ते रात्री घरीच होते. रात्री एकाने 'सेठ घरपर है क्या,' असे हाक मारली. त्यावर शहा आणि त्यांचा मुलगा दोघे घरातून खाली आले. त्यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्यावर मुलासमोरच गोळ्या झाडल्या. हल्लेखोरांनी तोंडाला रूमाल बांधलेला होता. खंडणीच्या प्रकरणातून त्यांच्यावर हा हल्ला झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Marathi news Pune news firing on builder