पावणेदोनशेहून अधिक परदेशी नागरिक काळ्या यादीत

पांडुरंग सरोदे
सोमवार, 26 मार्च 2018

पुणे हे शांत शहर आहे. या शहरामध्ये येणाऱ्या परदेशी नागरिकांनीही शहराच्या स्वभावानुसार राहिले पाहिजे. परंतु काही परदेशी नागरिक हे जाणीवपूर्वक विविध प्रकारचे गुन्हे करत असल्याचे लक्षात आले. त्यामध्ये अमली पदार्थ विक्रीपासून ते आर्थिक फसवणुकीपर्यंतच्या अनेक घटनांचा समावेश आहे. त्यामुळे कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर कारवाई होणे आवश्‍यक होते. त्यानुसार २०१७ मध्ये सर्वाधिक १३९ जणांना आम्ही काळ्या यादीत टाकले. त्यांना पाच-दहा वर्षे पुण्यामध्ये येता येणार नाही. 
- ज्योती प्रिया सिंह, पोलिस उपायुक्त.

पुणे - शांत शहर असा नावलौकिक असलेल्या पुण्यात शिक्षण, नोकरी, पर्यटन, वैद्यकीय व अन्य काही कारणांमुळे येणाऱ्या काही परदेशी नागरिकांकडून नियमांचेच उल्लंघन केले जात आहे. शहरात आर्थिक फसवणुकीपासून ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या तब्बल पावणेदोनशेहून अधिक परदेशी नागरिकांना मागील पंधरा महिन्यांत पोलिसांच्या विशेष शाखेने काळ्या यादीत टाकले आहे.

त्यामुळे पाच ते दहा वर्षापर्यंत त्यांना पुन्हा भारतात प्रवेश करता येणार नाही. 

काही दशकांपासून एज्युकेशन हब, इंडस्ट्रिअल हबपासून ते आयटी हबपर्यंतचा वेगवान प्रवास पुणे शहराने केला आहे. साहजिकच या शहराची जागतिक पातळीवरही तितकीच चांगल्या पद्धतीने ओळख निर्माण झाली. स्वस्त व चांगले शिक्षण, चांगली नोकरी आणि राहण्यासाठीही तितकेच शांत शहर हा वेगळेपणाही पुण्याने जपला. त्यामुळे अनेक देशांमधील नागरिक शिक्षण, नोकरी, पर्यटनाच्या निमित्ताने पुण्याकडे आकर्षित झाली. आफ्रिका खंडातील अनेक देशांमधील विद्यार्थी शिक्षणाच्या निमित्ताने पुण्याकडे आकर्षित होऊ लागले आहेत.

शहरात वास्तव्य करताना नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच विविध प्रकारचे गुन्हे करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण करणाऱ्यांवर कारवाई करण्यावर विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांनी लक्ष दिले. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करून वास्तव्य करणाऱ्या, गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असणाऱ्यांवर कारवाई करण्यास प्राधान्य दिले. त्यातूनच २०१६ या वर्षीच्या तुलनेत २०१७ या वर्षांत विविध प्रकारचे गुन्हे करणाऱ्या सर्वाधिक परदेशी नागरिकांना काळ्या यादीत टाकण्यास त्यांनी सुरवात केली. देश सोडायला लावणे व सक्तीने मायदेशी पाठविण्याच्या कारवाईच्या तुलनेत काळ्या यादीत गेलेल्या परदेशी नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

परदेशी नागरिकांवर कारवाई
दुसऱ्या व्यक्तीच्या नावावरील पासपोर्ट व व्हिसाचा वापर करून पुण्यात राहणाऱ्या परदेशी नागरिकावर विशेष शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून त्यास मायदेशी पाठविले. याबाबत न्यायालयीन प्रक्रियाही तितक्‍याच जलदगती झाली. 

विशेष शाखेच्या पोलिस उपायुक्त ज्योती प्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून परदेशी नागरिकांच्या पासपोर्ट व व्हिसाची नियमितपणे तपासणी केली जात आहे. पोलिसांकडून ही तपासणी सुरू असतानाच एका नायजेरियन नागरिकांविषयी पोलिसांना संशय आला. त्यामुळे त्यांनी त्यास जानेवारी महिन्यात ताब्यात घेतले. त्याच्या पासपोर्ट व व्हिसाची तपासणी केली. त्या वेळी ओखुबा किंगस्ले एबुका (वय ३५) या नागरिकाने दुसऱ्याच व्यक्तीच्या नावावरील पासपोर्ट व व्हिसाचा वापर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे पोलिसांनी एबुका यास ताब्यात घेतले.

मागील पाच-सहा महिन्यांपासून एबुका हा व्यवसायाच्या निमित्ताने पुण्यात राहात होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर परदेशी नागरिक कायद्याअंतर्गत बनावट कागदपत्रांद्वारे दिशाभूल व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला होता. 

याविषयी सिंह म्हणाल्या, ‘‘आम्ही हे प्रकरण न्यायालयात दाखल केले. त्यानुसार न्यायालयाने भारतीय दंड संहिता व परदेशी नागरिक कायद्यानुसार त्यास एक महिन्याचा कारावास व दंडाची शिक्षा सुनावली होती. त्याने न्यायालयात माफीही मागितली. ही प्रक्रिया जलदगतीने झाल्यामुळे त्यास मायदेशी पाठविणे तत्काळ शक्‍य झाले. त्याचे नाव काळ्या यादीत टाकले असून त्यास दहा वर्षांची भारतात बंदी घातली आहे.’’

परदेशी नागरिकांचे गुन्हे 
शहरात शिक्षण किंवा अन्य कारणांसाठी आलेल्या काही परदेशी नागरिक मूळ उद्देश बाजूला ठेवून अमली पदार्थ विक्री, चोरी, ऑनलाइन फसवणुकीसारखे गुन्हे करत असल्याचे पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये निदर्शनास आले आहे, तर काही जण वेगात वाहने चालवून एखाद्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरण्यापासून ते बनावट पासपोर्ट, कागदपत्रांद्वारे फसवणूक करत असल्याचे गंभीर प्रकार उघडकीस आले आहेत.

तरुणींकडून वेश्‍या व्यवसाय 
पर्यटनाच्या निमित्ताने पुण्यात येऊन व्हिसाची मुदत संपल्यानंतरही काही नागरिक शहरात वास्तव्य करत असल्याचा प्रकार काही वर्षांपासून घडत आहे. विशेषतः पर्यटन व्हिसावर आलेल्या परदेशी तरुणीकडून वेश्‍याव्यवसाय करून घेतला जात असल्याचे गुन्हे शाखेच्या सामाजिक  सुरक्षा विभागाच्या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. उझबेकिस्तान, थायलंड यांसारख्या देशांमधील तरुणींची पोलिसांनी सुटका केली आहे.

Web Title: marathi news pune news foreign people in black list