पुण्यात फुकट पार्किंग बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 21 मार्च 2018

पुणे - दिवस-रात्र रस्त्याकडेला गाडी लावणाऱ्या पुणेकरांच्या खिशाला आता चाट बसणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केलेल्या नव्या पार्किंग धोरणात चार चाकी वाहनांसह पहिल्यांदाच दुचाकी वाहनांनाही तासाला शुल्क आकारण्याचा समावेश आहे. पार्किंग शुल्कातून सुमारे तीनशे कोटी रुपयांचा महसूल जमेल, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.

पुणे - दिवस-रात्र रस्त्याकडेला गाडी लावणाऱ्या पुणेकरांच्या खिशाला आता चाट बसणार आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने मंगळवारी मंजूर केलेल्या नव्या पार्किंग धोरणात चार चाकी वाहनांसह पहिल्यांदाच दुचाकी वाहनांनाही तासाला शुल्क आकारण्याचा समावेश आहे. पार्किंग शुल्कातून सुमारे तीनशे कोटी रुपयांचा महसूल जमेल, असा महापालिका प्रशासनाचा अंदाज आहे.

यापूर्वी 24 डिसेंबर 2009 रोजी पार्किंग धोरण बनविले होते. त्यानंतर तब्बल आठ वर्षांनी नवे धोरण बनविले आहे. या धोरणानुसार, दुचाकी पार्किंगसाठी प्रतितासाला किमान दोन ते चार रुपये, रिक्षाला सहा ते 12 रुपये आणि मोटारींना दहा ते 20 रुपये शुल्क आकारण्यात येईल. नवे धोरण महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे मांडले जाईल आणि त्यानंतर वाहतूक पोलिसांसह सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय करून ते प्रत्यक्षात अमलात येईल. धोरण मंजूर करण्यासाठी महापालिकेकडे 43 दिवस आहेत, मात्र प्रत्यक्ष अंमलबजावणीला कधी सुरुवात होईल, याविषयी संदिग्धता आहे. महापालिकेची 23 मार्चला सर्वसाधारण सभा आहे. या सभेमध्ये आयत्या वेळचा विषय म्हणूनही हे पार्किंग धोरण मंजुरीसाठी ठेवले जाऊ शकते.

जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण योजना (जेएनएनयूआरएम) आणि मेट्रो प्रकल्प राबविताना पालिकेला पार्किंग धोरण राबविणे बंधनकारक होते. शिवाय, सर्वसाधारण सभेने सर्वंकष वाहतूक आराखड्यास मान्यता दिली, त्या वेळी पार्किंग धोरण जाहीर करणे अपेक्षित होते. मात्र, मेट्रो प्रकल्पासाठी पार्किंग धोरण निश्‍चित करण्याच्या मुदतीला काही दिवस शिल्लक असताना पार्किंग धोरण ठरविले आहे.

सर्वसाधारण सभेच्या मान्यतेनंतर आणि पार्किंगसाठी जागा निश्‍चित केल्यानंतर या धोरणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

वर्गवारीनुसार पार्किंगचे दर (रुपयांत)
(सकाळी आठ ते रात्री दहा वाजेपर्यंत, प्रतितास)

                                 अ                ब                क
दुचाकी -                      2                3                4
रिक्षा -                        6                9                12
मोटार -                      10              15              20
मालवाहू टेंपो -              6                9               12
मिनी बस  -                15              23               30
अवजड मालवाहू
वाहन आणि ट्रक  -       20              30              40
खासगी प्रवासी बस -    30              45               60

निवासी भागासाठी रात्रीचे पार्किंग दर
(रात्री दहा ते सकाळी आठपर्यंत)

- एका दिवसाला दहा रुपये, याप्रमाणे वार्षिक 3,650 रुपये
- जुने वाडे, जुनी वसाहत आणि समाविष्ट गावांतील इमारतींसाठी
- दिवसाला पाच रुपये याप्रमाणे वार्षिक 1,825 रुपये
- झोपडपट्टी वस्ती - दिवसाला अडीच रुपये याप्रमाणे वार्षिक 910 रुपये

पार्किंग धोरणावर प्रतिक्रिया मांडा www.esakal.com वर

Web Title: marathi news pune news free parking close