नदीपात्रात फुलवली भाजीची बाग, तरूणाचा स्तुत्य प्रयत्न

RiverSide
RiverSide

औंध (पुणे) : पुणे शहरातील व परिसरातील नद्यांच्या पात्रात चालत असलेला मासेमारी व्यवसाय काळाच्या ओघात बंद होत असताना शेकडो कुटूंबे यात बाधीत झाली आहेत. यामुळे मासेमारी करणाऱ्याया कुटूंबातील तरूण इतर रोजगाराच्या संधी शोधत आहेत. परंतु बोपोडी येथील आनंद काची या तरूणाने बोपोडी येथील मुळा नदी पात्रातील रिकाम्या पट्ट्यात भाजीपाला शेती करून रोजगार तर मिळवलाच परंतु ग्रामीण शेतीला शहरी रूप देत भाजीपाला उत्पादन घेऊन वेगळा मार्ग चोखाळला आहे.

मुळशी ते शिवाजीनगर परिसरातील संगमवाडीपर्यंत असलेल्या मुळा नदीच्या पात्रात काही ठिकाणी शेती योग्य जमीन असून यात भाजीची शेती केली तर यातून रोजगार मिळून नदी प्रदुषित होण्यापासून वाचवण्याचाही योग्य प्रयत्न यातून साध्य होऊ शकेल. आनंद काची हे पिढ्यानपिढ्या मासेमारी करणाऱ्या कुटूंबात जन्मलेले. नदीतील मासेमारीवर जगणारे हे कुटूंब मासेमारी करतानाच येथील नदी पात्रात शेतीही करत असे. आनंद यांच्या आजोबापासून ही शेती केली जात होती. परंतु आधुनिक काळात मासेमारीवर मर्यादा येऊन हा व्यवसायच बंद पडला आहे. यामुळे आनंद यांना वेगळा व्यवसाय शोधावा लागला. पूर्वीपासून केली जाणारी शेती ही घरातील गरज भागवण्यासाठी केली जायची परंतु आता ही शेती काची कुटूंबियांच्या उपजिविकेचे व रोजगाराचे साधन बनले आहे. या शेतीत त्यांनी कारली, वांगी, दोडका, मेथी, मिरची, घेवडा, भोपळा आदींची लागवड करून चांगले उत्पन्नही घेत आहेत. 

गेल्यावर्षी या शेतीने खुप मोठा आधार दिल्याने आमच्या कुटूंबाचा योग्य असा उदरनिर्वाह करू शकलो असल्याचे यावेळी आनंद काची यांनी सांगितले. या शेतीसाठी वार्षिक भाडेही सरकारला दिले जात असल्याचे काची यांनी सांगितले. या शेतीच्या कामात त्यांची पत्नी, भाऊही मदत करतात. नदी पात्रातील पाणी न वापरता नदीच्या पूर्वेला वाहत असलेल्या जीवंत झऱ्यातील पाणी वापरून ही शेती केली जाते. यामुळे यातून शुध्द व चवदार भाजीपाला उत्पादन केले जाते. हा भाजीपाला येथील जवळपासच्या परिसरात विक्री करून उदरनिर्वाह केला जातो. आपला पारंपारिक रोजगार संपला म्हणून न थांबता शेतीची वेगळी वाट चोखाळणाऱ्या आनंद काची सारखे कित्येक तरूण रोजगाराविना वणवण फीरत आहेत. अशा तरूणांना मार्गदर्शन व मदतीची गरज आहे. एकीकडे रोजगाराच्या संधी कमी होत असतांना तरूणांना अशा प्रकारे शेतीसाठी प्रवृत्त करून नदीपात्रातील मोकळ्या पट्ट्यात शेती करायला प्रोत्साहन दिले. तर नवीन पिढीतील तरूणही याकडे वळतील. तसेच पुणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नदीकाठच्या अशा शेतीला प्रोत्साहन मिळाले तर नदी स्वच्छ राहून खऱ्या अर्थाने पुणे स्मार्ट होण्यास मदत होईल.

गेल्या कित्येक वर्षे आम्ही येथे राहत असून आमचा पारंपारिक मासेमारीचा व्यवसाय बंद पडल्याने मी आता पूर्णवेळ शेती हा व्यवसाय म्हणून निवडला. यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह होईल एवढे उत्पन्न यातून मला मिळत आहे. या शेतीसाठी सरकारी नियमाप्रमाणे मी वार्षिक भाडेही भरत आहे. अशा प्रकारे शेती करणाऱ्यासाठी तरूणांना प्रोत्साहन व सरकारी मदत मिळाली तर मासेमारीतून बाहेर पडलेली कुटूंबे यातून उभी राहू शकतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com