स्नेहसंमेलनातून व्यक्तीमत्व विकास होईल - किशोरी शहाणे

प्रशांत चवरे
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

भिगवण : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलाकार दडलेला असतो परंतु जोपर्यंत पालक व शाळा त्यांना संधी देत नाही तोपर्यंत तो कलाकार समाजासमोर येत नाही. शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून भरविण्यात येत असलेल्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल व त्यांच्यातील दडलेला कलाकार लोकांसमोर येण्यास मदत होईल असे मत सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी व्यक्त केले.

भिगवण : प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये एक कलाकार दडलेला असतो परंतु जोपर्यंत पालक व शाळा त्यांना संधी देत नाही तोपर्यंत तो कलाकार समाजासमोर येत नाही. शाळा महाविद्यालयांच्या माध्यमातून भरविण्यात येत असलेल्या स्नेहसंमेलनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तीमत्व विकास होईल व त्यांच्यातील दडलेला कलाकार लोकांसमोर येण्यास मदत होईल असे मत सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे यांनी व्यक्त केले.

येथील भिगवण शिक्षण प्रसारक मंडळाच्या विविध विद्याशाखांचे वार्षिक स्नेहसंमेलन व दहावीच्या परिक्षा केंद्राचा शुभारंभ प्रसंगी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आमदार दत्तात्रय भरणे होते. पंचायत समितीचे सभापती किरणसिंह घोलप, पशुसंर्वधन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, राष्ट्रवादी व्यापार व उद्योग विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष अॅड. महेश देवकाते, भिगवण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, शंकर गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका उपाध्यक्ष विजयकुमार गायकवाड, रमेश धवडे, अण्णा धवडे, अशोक पाचांगणे अभयशेठ रायसोनी, संजय भरणे उपस्थित होते. 

किशोरी शहाणे यांनी आपला मराठी चित्रपट सृष्टीतील प्रवास प्रेक्षकांसमोर उलगडला. चला जेजुरीला जाऊ व अगं हेमा माझ्या प्रेमा ही गाणी गाऊन प्रेक्षक व विद्यार्थ्यांची मने जिंकली. अजित क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थ्यांची शैक्षणिक व सांस्कृतिक प्रगती व्हावी यासाठी स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून उत्तुंग व्यक्तीमत्वाची व विविध क्षेत्रातील यशस्वी त्यांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी दहावी व बारावीचे परिक्षा केंद्र येथील शैक्षणिक संकुलामध्ये उपलब्ध करुन दिले आहे. एकाच शैक्षणिक संकुलामध्ये इयत्ता दहावी व बारावीचे परिक्षा केंद्र असलेले हे एकमेव केंद्र आहे.  

कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार दत्तात्रय भरणे म्हणाले, ग्रामीण भागामध्ये विद्यार्थांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलन एक महत्वपूर्ण व्यासपीठ आहे. विद्यार्थ्यांनी या व्यासपीठाचा सकारात्मक वापर केला पाहिजे. विद्यालयाच्या माध्यमातुन राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबाबत त्यांनी कौतुक केले व विद्यालयास सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. स्नेहसंमेलनामध्ये विदयार्थ्यांनी पारपांरिक गीते, पोवाडा, नृत्य, मुक नाटक, लावणी आदी कला सादर केल्या. प्रास्ताविक प्राचार्य तुषार क्षीरसागर यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. अविनाश गायकवाड यांनी केले.

 

Web Title: Marathi news pune news gathering bhigwan