बापट विद्यार्थिनींसमोर म्हणाले, चल म्हटली की चालली!

Girish Bapat
Girish Bapat

पुणे : पुण्यातील श्री. ना. दा. ठाकरसी कन्याशाळेच्या शताब्दीपूर्तीच्या कार्यक्रमाला शिक्षण मंत्री विनोद तावडे पाहुणे म्हणून येणार होते, ते आलेच नाहीत. केंद्रीय मंत्री सत्यपालसिंह पुण्यात आल्यामुळे खासदार अनिल शिरोळेही येऊ शकले नाहीत. महापौर मुक्ता टिळक या तास, सव्वा तासाने आल्या आणि आपुलकीचे चार शब्द बोलून गेल्या.

कार्यक्रम आज सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेला, अखेर पालकमंत्री या नात्याने अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट वेळात वेळ काढून बारा साडेबाराच्या सुमारास आले. बापटांनी भाषणही त्यांच्या नेहमीच्या शैलीत सुरु केले. शाळेचा इतिहास, आव्हाने, महिलांची कर्तबगारी आदी बोलताना विवेकानंद जयंतीचेही स्मरण त्यांना झाले. त्यांची आठवण सांगण्यात बापट रमले.

ती आठवण मंत्री बापट यांच्याच शब्दात : " विवेकानंद परदेशात गेले होते, तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वामुळे, भाषणामुळे एक परदेशी युवती आकर्षित झाली. ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर एकदा तिने विवेकानंदाना भेटून सांगितले की, मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. आपण लग्न केले, तर मला आणि तुम्हाला तुमच्यासारखा तेजस्वी मुलगा होईल. बापट दोन, पाच सेकंद थांबले. पुढे म्हणाले. तो काळ आत्तासारखा नव्हता. चल, म्हटली की चालली ! विद्यार्थिनींना कळले बघा ! (पुन्हा दोन, पाच ,सेकंद पॉज) शारीरिक आकर्षण नव्हते. स्त्री-पुरूष संबंध याबाबत मी आत्ता काही बोलत नाही. ( पुन्हा शांतता)  विवेकानंद त्या युवतीला म्हणाले, बाई त्यासाठी लग्न करण्याची गरज नाही. मी तुम्हाला मातेसमान मानतो. तुम्ही मला मुलगा माना. असे विवेकानंद वेगळे होते.`` 

आधीच कार्यक्रम लांबलेला, त्यात मंत्री महोदयांची बोलताना गाडी रूळावरून थोडी घसरलेली ! आठवी ते बारावीच्या विद्यार्थीनींमध्ये याची कुजबुज न होईल तर नवल ! लिंगभाव समता ( जेंडर), संकेत, औचित्य याचे भान खरे तर ज्येष्ठांनी ठेवायलाच पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी याचीच गरज असते. हे भान नेमके बापट यांचे चुकले. या पूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसमोर बोलताना त्यांचा तोल गेला होता. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com