26 जानेवारी, 15 आँगस्ट, 1 मे रोजी ग्रामसभा घेऊ नका: अमोल घोळवे

संतोष आटोळे
बुधवार, 17 जानेवारी 2018

शासकिय नियमानुसार 30 मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. याच पद्धतीने दुसरी ग्रामसभा 9 ते 15 आँगस्ट दरम्यान घेणे अपेक्षित आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित राहत नाही.

शिर्सुफळ : 26 जानेवरी, 15 आँगस्ट, 1 मे व 2 आँक्टोंबर हे राष्ट्रीय सण आहेत. यावेळी प्रत्येक गावांमध्ये आयोजित ग्रामसभांमध्ये दप्तरांची पळवापळवी, प्रोसेडिंग रजिस्टर फाडणे, हाणामारी, ग्रामसेवकांना दमदाटी, जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे असे प्रकार होत असतात. त्यामुळे या दिवसांच्या आयोजित ग्रामसभा या दिवसांपूर्वी किंवा नंतर घेण्याची मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे पुणे विभागीय अध्यक्ष अमोल घोळवे यांनी केली आहे.  तसेच याबाबत निवेदन पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जगताप व सरचिटणीस संदिप ठवाळ यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले आहे. तसेच ग्रामसभांच्या दिवशी पुरेसे पोलीस संरक्षण उपलब्ध करून देण्याची मागणीही युनियनने केली आहे.

याबाबत अधिका माहिती देताना अमोल घोळवे म्हणाले, महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये 26 जानेवारी, 15 आँगस्ट, 2 आँक्टोबर, 1 मे या दिवशी ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन, महात्मा गांधी जयंती, महाराष्ट्र स्थापना दिवस या दिवशी गावागावात ग्रामसभांचे आयोजन करण्यात येते. मात्र अशा राष्ट्रीय उत्सवांवेळी सार्वजनिक सुट्टी असल्याने ग्रामसभेला ग्रामसेवक वगळता इतर संबंधित विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित राहत नाहीत. या ग्रामसभांमध्ये विकासकामांचे नियोजन, धोरणात्मक निर्णय घेणे अपेक्षित असताना या विशेष ग्रामसभा अनेक ठिकाणी राजकीय आखाडा बनल्या आहेत.याची अनेक उदाहरणे आहेत. त्याचा सर्वात मोठा फटका ग्रामसेवकांना बसत आहे. या दिवशी सार्वजनिक सुट्टी असतानाही ग्रामसेवक संवर्ग सुट्टीचा त्याग करून कामकाज करीत असतो. परंतु, यावेळी ग्रामसेवकांना होणारा त्रास पाहता या दिवशी होणा-या ग्रामसभा अन्य दिवशी घेण्याची गरज आहे. तसेच ग्रामसभांसाठी पोलीस बंदोबस्त असणे आवश्यक आहे.

शासकिय नियमानुसार 30 मे पूर्वी पहिली ग्रामसभा घेणे अपेक्षित असून 1 मे रोजी अर्थात महाराष्ट्र दिनी ग्रामसभा घेणे बंधनकारक नाही. याच पद्धतीने दुसरी ग्रामसभा 9 ते 15 आँगस्ट दरम्यान घेणे अपेक्षित आहे. प्रजासत्ताक दिनी ग्रामसभा घेण्याच्या सूचना असल्या तरी या दिवशी सार्वजनिक सुट्टी असल्याने नियम असूनही ग्रामसभेला इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी उपस्थित राहत नाही. त्यामुळे ग्रामसभेचा मूळ उद्देश साध्य होत नसल्याने प्रजासत्ताक दिनी होणारी ग्रामसभा इतर दिवशी आयोजित करण्यात यावी.प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिनी फक्त ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात यावेत. याबाबत शासनाने योग्य आदेश निर्गमित करावे अशी मागणी निवेदनाद्वारे सर्व संबंधितांकडे करण्यात आल्याचाही घोळवे यांनी दै.सकाळ प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Web Title: Marathi news Pune news gram sabha