ग्रामपंचायतीची सूत्रे नव्या पिढीच्या हातात

संतोष शेंडकर
बुधवार, 27 डिसेंबर 2017

सोमेश्वरनगर : करंजेपूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या लढतीत मतदारांनी प्रस्थापितांना सपशेल नाकारत नव्या पिढीच्या हातात सत्तेची सूत्रे सोपविली. युवकांचे उमेदवार वैभव अशोक गायकवाड यांनी मातब्बरांच्या गावकरी पॅनेलचे उमेदवार बबन आण्णा पवार यांचा तब्बल 315 मतांनी पराभव केला. 

सोमेश्वरनगर : करंजेपूल ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या लढतीत मतदारांनी प्रस्थापितांना सपशेल नाकारत नव्या पिढीच्या हातात सत्तेची सूत्रे सोपविली. युवकांचे उमेदवार वैभव अशोक गायकवाड यांनी मातब्बरांच्या गावकरी पॅनेलचे उमेदवार बबन आण्णा पवार यांचा तब्बल 315 मतांनी पराभव केला. 

करंजेपूल हे पश्चिम भागातील प्रमुख गाव असल्याने येथील लढतीकडे राजकीय धुरीणांचे लक्ष होते. ग्रामपंचायतीचे करंजेपूल एक, करंजेपूल दोन व गायकवाडमळा या तीन प्रभागातील आठपैकी सात जागांवर गावकरी पॅनेलचे उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. तर शेंडकरवाडी प्रभागात मात्र बिनविरोधचा मेळ न बसल्याने तीन जागांसाठी दोन गटात लढत सरळ लढत झाली. गावकरी पॅनेलने सरपंचपद इतर मागासप्रवर्गासाठी राखीव असल्याने बबन पवार यांना पहिली अडीच वर्षे आणि विजय कोळपे यांना उर्वरीत कालावधीसाठी सरपंच करण्याचा निर्णय घेतला. परंतु इतर मागास प्रवर्गातूनच उपसरपंच वैभव गायकवाड यांनीही सरपंचपदासाठी बंड करत दंड थोपटले. शेंडकरवाडी प्रभागातून उद्योजक राजकुमार धुर्वे, माजी सदस्य दिलीप कुंभार यांनीही सरपंचपदासाठी उडी घेतल्याने रंगत निर्माण झाली होती. वैभव गायकवाड यांच्यासोबत गावातील युवकांसोबत सोमेश्वर कारखान्याचे संचालक विशाल गायकवाड, माजी सरपंच बंडा गायकवाड, बाळू गायकवाड, सागर गायकवाड, विजय गायकवाड आदी उघडपणे मैदानात उतरले. सुरवातीला बबन पवार यांचेच वर्चस्व दिसत होते. परंतु हळूहळू गायकवाड यांना सर्वच प्रभागात पाठिंबा वाढत गेला आणि त्यांनी प्रस्थापितांना धक्का दिला. 

वैभव गायकवाड यांना 874, बबन पवार यांना 559, राजकुमार धुर्वे यांना 341 तर दिलीप कुंभार यांना अवघी 145 मते मिळाली. तर प्रभाग तीन (शेंडकरवाडी) येथे दोन गटात झालेल्या सरळ लढतीतही युवकांनी उभ्या केलेल्या पॅनेलच्या तिन्ही उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला. काही ज्येष्ठांनीही त्यांना साथ दिली. येथे गीतांजली समीर शेंडकर यांनी सर्वाधिक 368 मते मिळविली. प्रभाग दोनमध्ये गावकरी पॅनलच्या निखिल गायकवाड यांना निवृत्त मुख्याध्यापक संभाजी गायकवाड यांनी आव्हान दिले होते. परंतु निखील गायकवाड यांनी 25 मतांनी विजय मिळविला. 

निवडून आलेले सदस्य व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे -

प्रभाग क्रमांक एक - 
निलेश विठ्ठल गायकवाड, लतीफ गफूर मुलाणी, सुनिता गणेश गायकवाड (तिन्ही बिनविरोध)

प्रभाग क्रमांक दोन -
सारिका नानासाहेब गायकवाड, सविता जयराम लकडे (दोन्ही बिनविरोध), निखिल रमेश गायकवाड (232)

प्रभाग क्रमांक तीन - 
सोनलकुमार उत्तम शेंडकर (321), गीतांजली समीर शेंडकर (368), राणी बिरू महानवर (330)

प्रभाग क्रमांक चार -
अजित अप्पासाहेब गायकवाड, निलम प्रमोद गायकवाड (दोन्ही बिनविरोध)

 

Web Title: Marathi news pune news grampanchayat in hands of youth