गुटखा विक्रेत्यांना पोलिसांचे अभय?

Crime
Crime

राज्य सरकारने खाद्यपदार्थ आणि तंबाखू एकत्रित विक्री करण्यावर नुकतेच निर्बंध घातले. तसेच, गुटखा विक्रीवर यापूर्वीच निर्बंध घालण्यात आले आहेत. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथक आणि अन्न व औषध द्रव्य (एफडीए) प्रशासनाने गेल्या काही दिवसांत शहरात विविध ठिकाणी छापे टाकून गुटखा जप्त केला. गुटखाबंदी असूनही पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरात परराज्यांतून मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्रीसाठी येत आहे. त्यावरून शहरात गुटखा विक्रेत्यांचे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त होत आहे. तसेच, पोलिस आणि एफडीए प्रशासनाकडून गुटखा विक्रेत्यांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना, असा प्रश्‍नही सर्वसामान्यांना पडला आहे. 

राज्यात गुटखा खाऊन कर्करोगाने मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मागच्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. तरुण पिढी झपाट्याने गुटख्याच्या आहारी जात असल्याने सरकारने गुटखाबंदीचा निर्णय घेतला.

मात्र, या निर्णयाला अनेक महिने लोटूनही पुण्यात गुटखा शौकिनांना तो सहजपणे उपलब्ध होत आहे. शहरात पोलिसांनी काही दिवसांपूर्वी आरएमडी, एम. गोल्ड, विमल आणि सुगंधी मिक्‍स सुपारीचा लाखो रुपयांचा साठा जप्त केला. कोथरूडमधील दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात गुटखा विक्रीसाठी आणला जात असल्याची कबुली पोलिसांकडे दिली होती. गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून गुटखा विक्री रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एफडीए प्रशासनाकडूनही सातत्याने मोहीम राबविण्यात येते.

मात्र, शहरातील पानटपऱ्यांवर गुटखा नेमका येतो कोठून, असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. त्यामुळे गुटखा तस्करी करणाऱ्यांवर पोलिस आणि एफडीए प्रशासनाचा वचक राहिला नसल्याचे स्पष्ट होत आहे. 

राज्यात कर्नाटक आणि गुजरात राज्याच्या सीमेवरून गुटखा आणला जातो. काही स्थानिक व्यापाऱ्यांकडून गुटखा खरेदीबाबत ठोक व्यापाऱ्याकडे ऑर्डर केली जाते. त्यावर ठोक व्यापाऱ्यांकडून त्यांना दोन- चार दिवसांत मालाची व्यवस्था होईल, असे सांगितले जाते. ठोक व्यापारी फोनवर अचानक एखाद्या विशिष्ट ठिकाणी अर्ध्या तासात टेम्पो घेऊन या, असे सांगतो. तेथे टेम्पो घेऊन गेल्यानंतर ठोक व्यापाऱ्यामार्फत आलेली व्यक्‍ती दुचाकीवर येते. ती व्यक्‍ती तेथे दुचाकी ठेवून तो टेम्पो घेऊन जाते. टेम्पो घेऊन आलेल्या लोकांना गोडाऊनची माहिती होऊ नये, यासाठी त्यांना सोबत घेतले जात नाही. सुमारे एक तासानंतर ती व्यक्‍ती टेम्पोमध्ये गुटखा भरून संबंधित व्यापाऱ्याकडे तो माल देते. गुटखा विकणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांकडून सध्या ही पद्धत वापरण्यात येत आहे. ही बाब पोलिस आणि प्रशासनाला माहीत असूनही शहरात मोठ्या प्रमाणावर गुटखा येत आहे. शहरात गुटखा साठवणूक करण्यासाठी गोडाऊनही असल्याचे बोलले जात आहे. पोलिस आणि एफडीए प्रशासन केवळ वरवरची कारवाई करण्याऐवजी गुटखा तस्करांना कायमस्वरूपी रोखण्यासाठी गांभीर्याने प्रयत्न करणार का, हा खरा प्रश्‍न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com