पुणे- उरुळी कांचनमध्ये चोऱ्यांच्या गुन्ह्यात वाढ

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 9 मार्च 2018

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रास्ता परिसरातून दुचाकीच्या कापडी डिकीमधून ५ लाख ८४ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदास ज्ञानेश्वर चोरमले (वय - ३१, रा. गोतेमळा, बिवरी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली.

उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील आश्रम रास्ता परिसरातून दुचाकीच्या कापडी डिकीमधून ५ लाख ८४ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना शुक्रवारी (ता. ९) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामदास ज्ञानेश्वर चोरमले (वय - ३१, रा. गोतेमळा, बिवरी, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी रामदास चोरमले यांनी घरून आणलेले दोन लाख रुपये, वाडे बोल्हाई (ता. हवेली) येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखेतून काढलेले दीड लाख रुपये व उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतून काढलेले २ लाख ३४ हजार असे एकूण ५ लाख ८४ हजार रुपये व ५० हजार रुपयांचा मोशी येथील बँकेचा धनादेश व बँकांचे पासबुक दुचाकीच्या कापडी डिकीमध्ये ठेवले होते.

दरम्यान चोरमले आश्रम रास्ता येथील परिवर्तन सोसायटीच्या आवारातील एका मोबाईल शॉपी मध्ये प्लॅस्टिक पिशवी आणण्यासाठी गेले होते. तसेच त्यांनी माघारी येऊन पाहिले असता दुचाकीच्या डिकीमध्ये पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावरून चोरमले यांना आपले पैसे चोरीला गेल्याचे लक्षात आल्याने त्यांनी अज्ञात चोरट्याविरोधात पोलिसांत तक्रार दिली. पोलिस हवालदार शशिकांत पवार या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

चोराची तिसरी घटना

पहिली घटना १७ फेब्रुवारी २०१८ रोजी घडली, यामध्ये बँक ऑफ इंडिया शाखेतून महिला बचत गटाची रक्कम घेऊन निघालेल्या महिलेला दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तरुणांनी धक्का देऊन  ८६ हजार रुपये लांबविले होते. दुसऱ्या घटनेत २० फेब्रुवारी रोजी आश्रम रस्त्यावर दुचाकीच्या हँडलला अडकविलेले ६० हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी पळविले होते. तर शुक्रवारी घडलेल्या तिसऱ्या घटनेत तब्बल ५ लाख ८४ हजार रुपयांची रोकड चोरीला गेली.

या तिन्ही घटनांवरून गावाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यामध्ये ग्रामपंचायतीने मागील एक महिन्यापासून सीसीटीव्ही यंत्रणेसाठी ५ लाख रुपयांची तरतूद केली आहे, मात्र निविदा प्रक्रियेच्या चक्रात सीसीटीव्ही यंत्रणा अडकली आहे. यामुळे चोरी सारख्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यात पोलिस यंत्रणेला कठीण झाले आहे. या सर्व गोष्टींमुळे चोरांचा सुळसुळाट वाढला असून वाढत्या चोऱ्यांना आळा घालण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Web Title: Marathi news pune news increase in theft