उरलेले आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी : डॉ. जयंत नारळीकर

उरलेले आयुष्य वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रचारासाठी : डॉ. जयंत नारळीकर

पुणे : ''पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील विज्ञानाचा पाया रचला. त्यानंतर समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्याची गरज होती. परंतु स्वातंत्र्यप्राप्तीच्या 70 वर्षांनंतरही आपला देश अंधश्रद्धा व चुकीच्या समजुतींमध्ये अडकला आहे. हे थांबविण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाबाबत जनजागृती होणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच उरलेल्या आयुष्याचा उपयोग करेल,'' अशी भावना ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केले. 

माईर्स एमआयटीतर्फे आयोजित कार्यक्रमात 'भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार' वितरण करण्यात आले. ज्येष्ठ संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर, उद्योजक नानीक रुपानी, 'एमआयटी'चे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड, मंगेश कराड, राहुल कराड यांच्या उपस्थितीत डॉ. नारळीकर यांना 'भारत अस्मिता राष्ट्रीय विज्ञान-तंत्रज्ञान श्रेष्ठ' पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पं. राजन मिश्रा व पं. साजन मिश्रा यांना संगीतासाठी, अभिनेता मनोज जोशी यांना अभिनयासाठी 'जनजागरण श्रेष्ठ' पुरस्कार; व्यवस्थापन तज्ज्ञ रमा बिजापूरकर यांना 'आचार्य श्रेष्ठ पुरस्कार', तर खासदार राजीव सातव यांना 'जनप्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार' देण्यात आला. 

पं. साजन मिश्रा म्हणाले, ''भारतातील शिक्षण पद्धतीमधील स्पर्धा हटविली तर देशातील खरे 'टॅलेंट' पुढे येईल. शिक्षक हा विद्यार्थ्याला जीवनाचा मार्ग दाखवितो; तर गुरू-शिष्य परंपरेत गुरू हा शिष्याचा अहंकार काढून त्याला घडविण्याचे काम करतो. तेच काम आमच्या गुरूंनी केले.'' 

बिजापूकर म्हणाल्या, ''विद्यार्थ्याने गुरूंच्या पुढे जाणे हीच गुरूंसाठी सर्वांत मोठी गुरुदक्षिणा आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि त्यादृष्टीने जगही आपल्याकडे पाहू लागले आहे.'' 

जोशी म्हणाले, ''संत ज्ञानेश्‍वर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमीत माझा जन्म झाला. तेच माझ्या यशाचे गमक आहे. अनेक चित्रपट, नाटके केली; पण पुरस्काराची अपेक्षा ठेवली नाही. 'चाणक्‍य' मालिकेतील भूमिकेने मला सर्वकाही दिले.'' 

मोदी लाटेची भीती दाखवून मला लोकसभेची निवडणूक न लढण्याचा सल्ला दिला जात होता. गुजरात निवडणुकीतही तेच सांगितले जात होते. परंतु मनापासून लढलो, तर अशक्‍य गोष्टही शक्‍य होते, हे विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे. 
- राजीव सातव, खासदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com