singing
singing

कलाश्री संगीत महोत्सवात श्रुती देशपांडे यांचे बहारदार गायन

जुनी सांगवी : जुनी सांगवी येथील कलाश्री संगीत मंडळाच्या '२१ व्या कलाश्री संगीत महोत्सवा'चा प्रारंभ दरवर्षीप्रमाणे यंदाही दिमाखदार झाला. सुरवातीला कलाश्री संगीत विद्यालय व राधानंद संगीत विद्यालयातील विद्यार्थ्यांचे गायन व  तबला वादन झाले. त्यानंतर श्रुती देशपांडे यांचे बहारदार गायन झाले.

कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन नगरसेविका माई ढोरे, नगरसेविका माधवी राजापुरे, नगरसेविका शारदा सोनवणे, मनोहर ढोरे या मान्यवरांच्या हस्ते झाले. कलाश्री संगीत महोत्सवाच्या पाहिल्या सत्रात पं. मकरंद हिंगणे यांनी गुंफायला सुरवात केली. त्यांनी राग पुरिया धनाश्री अतिशय सुंदर व बहारदार सादर केला. पुरिया धनाश्री रागात 'घर कैसे जाऊ' हा बडा ख्याल तर छोटा ख्याल मध्ये 'गंगा के संग सरिता मिलने' या बंदिशींचे बहारदार सादरीकरण केले. त्यानंतर त्यांनी "आम्हा न कळे काही" हा अभंग सादर केला. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत अविनाश दिघे, तबला साथसंगत अविनाश पाटील, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार, टाळासाठी सर्वेश बाद्रायणी तसेच तानपुऱ्यासाठी सुखदा बेहेरे-दीक्षित व चिन्मय दीक्षित यांनी साथसंगत केली.

कार्यक्रमाचे दुसरे पुष्प श्रुती देशपांडे यांनी सादर केले. त्यांनी राग "श्री" मध्ये विलंबित ऐकतालात "वारी जाऊ रे" तर द्रुत तिनतालमध्ये "चलो री  माई राम सिया दरसन" या बांदिशी अतिशय बहारदारपणे सादर केल्या. 

त्यानंतर त्यांनी एक तरणा व "बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल" या अभंगाने कार्यक्रमाच्या मैफिलीत रंग भरून कार्यक्रमाची उंची वाढविली. त्यांना हार्मोनियमवर साथसंगत उदय कुलकर्णी, तबला साथसंगत पं. पांडुरंगजी मुखडे, पखवाजाची साथसंगत गंभीर महाराज अवचार यांनी केली. तसेच त्यांना स्वरसाथ व तानपुरासाथ ऋतुजा देशपांडे व रुचिका कुलकर्णी यांनी केली.

श्रुती देशपांडे यांच्या गायनानंतर उ. शाकिर खाँ यांचे बहारदार सतार वादन झाले. त्यांनी राग "चारुकेशी" मध्ये आलाप, जोड झाला. यानंतर अतिशय उत्कृष्ठरित्या एक गत केली. त्यांना तबला साथ निलेश रणदिवे यांनी केली व तानपुरा साथ आर्य ताडपळे यांनी केली.

२१ व्या कलाश्री संगीत महोत्सवाच्या पहिल्या दिवसाची सांगता पं. धनंजय हेगडे यांच्या गायनाने झाली. त्यांनी राग दरबारी कानडाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या  गायनाला हार्मोनियमची साथ अविनाश दिघे व तबला साथ भरत कामात यांनी केली. त्यांना तानपुरा साथ योगिनी ढगे व दिगंबर शेडूळे यांनी केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. नामदेव तळपे आणि प्राची पांचाळ यांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com