कर्वे रस्त्यावर मेट्रोमार्गासाठी लगीनघाई!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

पुणे - शहरातील वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर मध्यभागी मेट्रोमार्गाचे काम सुरू होणार असल्यामुळे पूर्वतयारीच्या कामाला वेग आला आहे. महिनाअखेरीस या रस्त्यावर वाहतुकीत बदल करून कामाला सुरवात होणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून एसटी बससाठी पर्यायी रस्ता शोधण्यास सुरवात केली आहे. 

पुणे - शहरातील वर्दळीच्या कर्वे रस्त्यावर मध्यभागी मेट्रोमार्गाचे काम सुरू होणार असल्यामुळे पूर्वतयारीच्या कामाला वेग आला आहे. महिनाअखेरीस या रस्त्यावर वाहतुकीत बदल करून कामाला सुरवात होणार आहे. दरम्यान, एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी या रस्त्याची पाहणी करून एसटी बससाठी पर्यायी रस्ता शोधण्यास सुरवात केली आहे. 

कर्वे रस्त्यावर मेट्रोमार्गाचे काम सुरू करण्याची तयारी महामेट्रोने केली आहे. त्यासाठी महापालिका आणि वाहतूक पोलिसांची दोनवेळा संयुक्त पाहणी झाली आहे. महामेट्रोने तयार केलेल्या वाहतूक आराखड्याला पोलिसांनी अद्याप मंजुरी दिलेली नाही; मात्र काही उपाययोजना सुचविल्या आहेत. या रस्त्यावर दशभुजा गणपती ते डेक्कन कॉर्नरदरम्यान दुतर्फा ‘नो पार्किंग’ होणार आहे. त्यासाठी महापालिकेने फलक लावण्यास सुरवात केली आहे.

तसेच रस्त्याच्या मध्यभागी मेट्रोचे खांब असतील. त्यासाठी किमान दोन मीटर रस्ता व्यापला जाईल, तर दोन्ही बाजूंना वाहतुकीसाठी प्रत्येकी सहा मीटर रस्ता उपलब्ध असेल. त्यासाठी एसएनडीटी महाविद्यालयापासून नळस्टॉप चौकादरम्यान काही ठिकाणी पदपथ अरुंद करण्याचेही काम सुरू असल्याचे मंगळवारी प्रत्यक्ष पाहणीत दिसून आले. 

एसएनडीटी महाविद्यालयापासून आठवले चौकादरम्यान कालव्याच्या रस्त्याचेही रुंदीकरण करण्याचे काम महापालिकेने सुरू केले आहे. तसेच आठवले चौकापासून नळस्टॉप चौकापर्यंत उजवीकडील रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामालाही प्रारंभ झाला आहे. तसेच पीएमपीशी चर्चा करून महामेट्रोने एसएनडीटीसमोरील रस्त्यावरील दोन बसथांबे दशभुजा गणपती मंदिराच्या अलीकडे म्हणजे उड्डाण पुलाच्या सुरवातीला स्थलांतरित केले आहेत; मात्र प्रवासी अजूनही जुन्याच थांब्यावर उभे राहत असल्यामुळे बसही तेथेच उभ्या राहत असल्याचे दिसून आले. 

कर्वे रस्त्यावरून एसटी महामंडळाच्या अनेक बस धावतात. या रस्त्यावर मेट्रोमार्गाचे काम सुरू झाल्यावर या बसची पर्यायी रस्त्याने व्यवस्था करण्याची विनंती महामेट्रोने महामंडळाला केली आहे. त्यानुसार महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी पाहणी केली, तसेच पर्यायी रस्त्याची व्यवस्था पंधरा दिवसांत करण्याचे आश्‍वासनही दिल्याचे समजते. 

दोन-तीन मार्चपासून बदल
फलक लावणे, पदपथांची रुंदी कमी करणे, रस्त्यांची रुंदी वाढविणे, दुभाजक काढणे आदी कामे येत्या पंधरा दिवसांत पूर्ण होतील, असे महामेट्रोच्या सूत्रांनी सांगितले. त्यानंतर लगेचच कर्वे रस्त्यावरील वाहतूक चक्राकार मार्गाने वळविण्यात येईल. दोन किंवा तीन मार्चपासून हा बदल अस्तित्वात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

अशी असेल चक्राकार वाहतूक
पौड आणि कर्वे रस्त्यावरून येणारी वाहने एसएनडीटी महाविद्यालयापासून कालव्याच्या रस्त्याने डावीकडे आठवले चौकात जातील. ज्या वाहनचालकांना डेक्कनच्या दिशेने जायचे आहे, त्यांना आठवले चौकातून नळस्टॉप चौकात यावे लागेल. तेथून डावीकडे वळण घेऊन ते डेक्कन जिमखान्याच्या दिशेने जातील. या रस्त्यावर मेट्रोमार्गाचे काम पूर्ण होण्यास एक वर्षाचा कालावधी लागेल. तोपर्यंत बदल कायम राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: marathi news pune news karve road metro route