'सकाळ'च्या कर्मचारी मांजामुळे गंभीर जखमी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

न्यायालयाने निर्बंध घालूनही नायलॉन मांजाची विक्री 
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर निर्बंध घालूनही शहरात त्याची विक्री होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून, नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

पुणे : पतंगासाठी वापरण्यास बंदी असलेल्या चिनी मांजामुळे "सकाळ'च्या जाहिरात व मार्केटिंग विभागातील महिला कर्मचारी सुवर्णा मुजुमदार या गंभीर जखमी झाल्या. बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पुणे महापालिका भवनाकडे जाणाऱ्या शिवाजी पुलावरून त्या दुचाकीवर घरी जात होत्या, त्या वेळी मांजा गळ्याभोवताली गुंडाळून गळा कापल्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

शहर व उपनगरात गेल्या अनेक दिवसांपासून पतंग उडविण्यासाठी अत्यंत घातक असा "नायलॉन'चा चिनी मांजा सर्रास वापरला जात आहे. पुणे महापालिकेसह पोलिस प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही पतंग उडविण्यासाठी मांजा वापरला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाची बंदी असूनही शहरातील दुकानांमध्ये सर्रास हा मांजा विकला जात आहे. परिणामी, या मांजामुळे अनेक किरकोळ ते गंभीर अपघाताच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीवरून जाणाऱ्या महिला, लहान मुले जखमी होण्याचे प्रमाण वाढत आहे. 

न्यायालयाने निर्बंध घालूनही नायलॉन मांजाची विक्री 
पुणे : सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर निर्बंध घालूनही शहरात त्याची विक्री होत आहे. न्यायालयाच्या निर्णयाला धाब्यावर बसवून, नायलॉन मांजा विकणाऱ्या विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. 

पतंग उडविताना काही हौसी तरुणांकडून नायलॉनचा चिनी मांजा वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. या नायलॉनच्या मांजामुळे लहान मुलांसह दुचाकीवरून जाणाऱ्या नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. या मांजाने लहान मुले आणि दुचाकीस्वारांचे हात आणि गळा चिरल्याच्या घटना घडत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने नायलॉन मांजा उत्पादन आणि विक्रीवर निर्बंध घातले आहेत. शहरात बुधवारी मांजामुळे तरुणीचा गळा चिरून ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर शहरातील पतंग विक्रेत्यांकडून नायलॉन मांजा विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. थोडासा नफा मिळविण्यासाठी हे विक्रेते नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. त्यांच्या या कृतीमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे. शहर पोलिस या पतंग विक्रेत्यांवर कठोर कारवाई कधी करणार, असा प्रश्‍न नागरिकांमधून विचारला जात आहे. 

नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई करणार : शुक्‍ला 
शहरात नियमांचे उल्लंघन करून नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. यासंदर्भात पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, असे पोलिस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला यांनी "सकाळ'ला सांगितले. 

शहरात बुधवारी नायलॉन मांजामुळे दुचाकीवरून जाणारी तरुणी गळा चिरून गंभीर जखमी झाली. या घटनेची पोलिस आयुक्‍त शुक्‍ला यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. राज्य सरकारने नायलॉन मांजाच्या विक्रीवर निर्बंध घातले आहेत. तो विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्यावर कारवाई करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत. तसेच गुजरातमध्ये नायलॉन मांजापासून अपघात टाळण्यासाठी कोणती खबरदारी घेण्यात येते, ते पाहून त्याची पुणे शहरात अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: Marathi news Pune news kite manja illegal