कोरेगाव भीमात दंगल; एकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

कोरेगाव भीमा लढाईच्या द्विशताब्दीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विजयस्तंभ स्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या या दंगलीमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले. या तणावामुळे नगर रस्त्यावरील सर्व दुकाने बंद ठेवली होती.

कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथील दोन गटांतील वाद शांत झालेला असताना विजयस्तंभ अभिवादन दिनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी दोन्ही गटांचे कार्यकर्ते कोरेगाव भीमा येथे समोरासमोर आले आणि घोषणाबाजी होऊन वाद चिघळला. त्याचे पर्यवसान दगडफेक, वाहने व मालमत्तेच्या जाळपोळीत झाले. पुणे-नगर रस्त्यावर कोरेगाव भीमा, वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूर तसेच कोंढापुरी येथे अनेक वाहनांची तसेच रस्त्यावरील दुकानांची तोडफोड व जाळपोळ झाली. या घटनेत एक जण ठार, दोन जण गंभीर जखमी, तर काही जण किरकोळ जखमी झाले.

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे सकाळी संभाजी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दोन गटांचे कार्यकर्ते एकत्र आले असता दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणा देण्यात आल्या. वढू बुद्रुक ग्रामस्थांनी दर्शनानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांना माघारी पाठविले; मात्र कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे पुन्हा हे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन समोरासमोर आले आणि सकाळी साडेअकरा वाजता दंगल सुरू झाली. दंगलखोरांनी 15 ते 20 दुचाकी व चारचाकी वाहनांची जाळपोळ केली. तसेच अनेक वाहनांची व रस्त्यालगतच्या दुकानांची तोडफोड करण्यात आली. जमावाच्या संख्येपुढे पोलिसबळ अपुरे पडल्यामुळे सुमारे तीन-चार तास हा धुमाकूळ सुरू होता. या घटनेचे पडसाद वढू रस्ता, सणसवाडी, शिक्रापूरपर्यंत उमटले. डोक्‍यात दगड मारल्याने सणसवाडीत एका तरुणाचा मृत्यू झाला, तर कोरेगावात दोघे जखमी झाले. राहुल फटांगळे (वय 28) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे.

या घटनेत समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, तसेच पोलिस अधिकाऱ्यांच्या वाहनांवरही दगडफेक करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थांना याची मोठी झळ बसली. पोलिस अधीक्षक सुवेझ हक सायंकाळी उशिरापर्यंत स्वतः परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत होते; मात्र जमावापुढे त्यांना हतबल व्हावे लागले. चारचाकी व दुचाकी वाहने पेटवल्यामुळे दूरवरून धुराचे लोट दिसत होते. त्यामुळे नेमके काय घडले आहे, याचा अंदाज बाहेरून येत नव्हता.

पोलिसांनी अखेर दुपारी तीनच्या सुमारास अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून लाठीमार करत जमावाला पांगवले व पुणे- नगर महामार्ग मोकळा केला.

कोरेगाव भीमा लढाईच्या द्विशताब्दीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी विजयस्तंभ स्थळी अभिवादनाचा मोठा कार्यक्रम होत असतानाच कोरेगाव भीमा परिसरात झालेल्या या दंगलीमुळे कार्यक्रमाला गालबोट लागले. या तणावामुळे नगर रस्त्यावरील सर्व दुकाने बंद ठेवली होती.

दरम्यान, ""जमावाने घरांसमोर हातात झेंडे घेऊन तोडफोड, जाळपोळ केली, तरी पोलिसांनी प्रतिबंध केला नाही. आमचे एवढे नुकसान होऊनही पोलिसांनी आमच्यावरच लाठीमार केला. दंगेखोरांवर काहीच कारवाई केली नाही,'' असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला. आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्या कुसुम मांढरे, पंचायत समिती सभापती सुभाष उमाप, उपसभापती मोनिका हरगुडे आदींनी नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे.

Web Title: Marathi news Pune news Koregaon Bhima riot