लोणी काळभोरमध्ये गावठी दारूभट्ट्यांवर कारवाई

जनार्दन दांडगे
शुक्रवार, 2 मार्च 2018

लोणी काळभोर : जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेज हक जिल्हा ग्रामीण पोलिस हद्दीत गावठी दारू उत्पादन व विक्री बंद असल्याची टिमकी वाजवत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरात बुधवारी (ता. २८ फेब्रुवारी) मध्यरात्री गावठी दारूभट्ट्यांवर छापा टाकून १७ हजार १५० लीटर तयार दारू, ४३ हजार लीटर दारू तयार करण्याचे रसायन, १० वाहने व इतर साहित्य असा २२ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

लोणी काळभोर : जिल्हा ग्रामीण पोलिस अधिक्षक सुवेज हक जिल्हा ग्रामीण पोलिस हद्दीत गावठी दारू उत्पादन व विक्री बंद असल्याची टिमकी वाजवत असताना, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी हवेली तालुक्यातील शिंदवणे व सोरतापवाडी परिसरात बुधवारी (ता. २८ फेब्रुवारी) मध्यरात्री गावठी दारूभट्ट्यांवर छापा टाकून १७ हजार १५० लीटर तयार दारू, ४३ हजार लीटर दारू तयार करण्याचे रसायन, १० वाहने व इतर साहित्य असा २२ लाख ४८ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मागील काही वर्षात जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत एवढ्या मोठ्या प्रमाणात गावठी दारू सापडण्याची पहिलीच वेळ असून सुवेज हक यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

 सुवेज हक यांनी मागील एक वर्षापूर्वी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील मटका, जुगार दारू इत्यादी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले होते. त्या आदेशानुसार ग्रामीण पोलिसांनी आपापल्या हद्दीतील अवैध धंदे बंद असल्याचे लेखी माहिती पोलिस अधीक्षकांना दिली होती. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कालच्या कारवाईने पोलिस अधिकारी व हक यांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हवेली तालुक्याच्या शिंदवणे व सोरतापवाडी गावच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर गावठी दारू तयार केली जात असल्याची खात्रीलायक माहिती खबऱ्यामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाळा मिळाली. त्यानुसार पुणे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली होळी व धुलिवंदन सनाच्या पार्श्वभूमीवर उत्पादन शुल्क विभागाच्या पुणे विभागीय भरारी पथकाने बुधवारी वरील ठिकाणी कारवाई केली. या कारवाईमध्ये कंजारभटवस्ती येथे पाच ठिकाणी दारू भट्ट्या सुरु होत्या. पोलिस आल्याचे पाहून भट्टीमालक व भट्टीवर काम करणारे कामगार अंधाराचा फायदा घेवून पसार झाले. याचवेळी सदरच्या ठिकाणी ३५ लीटरचे ५४ कॅन व ४३ हजार लीटर रसायन व मळीने भरलेले बॅरल आढळून आले. तसेच परिसरात आणखी शोध घेतला असता शेजारच्या सिमेंट वीट निर्मितीच्या कारखान्यात ११९ कॅन व अर्धा किलोमीटर अंतरावरील पडक्या घरामध्ये २३४ कॅन आढळून आले. तसेच गावठी दारू खरेदीसाठी आलेले काहीजण अंधाराचा फायदा घेवून पसार झाले, मात्र दारूच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या ५ दुचाकी जप्त करण्यात आल्या. सबंधित भट्टी मालक व जप्त केलेल्या वाहन मालकांना फरारी घोषित करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 

या कारवाईमध्ये निरीक्षक जे. बी. होले, अनंत झाडे, गणेश वाव्हळे अशोक पाटील, उषा दहिफळे, शरद हांडगर, सतिश पोंधे, संदीप मांडवेकर, भारत नेमाडे, मिनाज शेख यांनी सहभाग असून उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नंदकुमार जाधव प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

यावेळी नंदकुमार जाधव म्हणाले,"राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या माहितीच्या आधारे बुधवारी सायंकाळी सात वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत दारूभट्ट्यांवर कारवाई केली. या कारवाई भट्टीमालक फरार झाले असून सुमारे साडेबावीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ यांच्या उपस्थितीत गुरवारी (ता. ०१) दिवसभर जेसीबीच्या सहाय्याने सदरच्या सर्व भट्ट्या व दारू साठविण्याच्या टाक्या उध्वस्त केल्या. तसेच यापुढील काळात उत्पादन शुल्क विभागाकडून संपूर्ण जिल्हाभर कारवाईचे सत्र सुरु राहणार आहे."

Web Title: Marathi news pune news loni kalbhor police