पुणे - मांजरी ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या

कृष्णकांत कोबल 
सोमवार, 26 फेब्रुवारी 2018

मांजरी (पुणे) : ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने गेल्या दहा दिवसांपासून सभा, पादयात्रा, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपाने मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी गाव ढवळून निघाले आहे. एकमेकांच्या विरोधात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या दोन्हीही ग्रामपंचायतीसाठी उद्या (ता. २७) मतदान होणार आहे. त्याबाबत उमेदवारांमध्ये उत्कंठा वाढली आहे.

मांजरी (पुणे) : ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने गेल्या दहा दिवसांपासून सभा, पादयात्रा, घोषणाबाजी आणि आरोप-प्रत्यारोपाने मांजरी बुद्रुक व शेवाळवाडी गाव ढवळून निघाले आहे. एकमेकांच्या विरोधात धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. या दोन्हीही ग्रामपंचायतीसाठी उद्या (ता. २७) मतदान होणार आहे. त्याबाबत उमेदवारांमध्ये उत्कंठा वाढली आहे.

मांजरीमध्ये सरपंच पदासह सहा प्रभागातून 18 जागांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी 46 उमेदवार रिंगणात आहेत. शेवाळवाडीमध्ये 11 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात आहेत. येथील जिल्हापरिषद शाळेततील चार केंद्रावर 3 हजार 648 मतदार मतदान करणार आहेत. मांजरीमध्ये प्रथमच जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने या निवडणूकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उमेदवारांसह नागरिंकांमध्येही त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रत्येक मतदाराला आपल्या प्रभागातील सदस्य पदाच्या उमेदवारासह सरपंच पदाच्या उमेदवारासाठीही मतदान करायचे आहे. गावाच्या विविध भागातील 23 केंद्रावर 27 हजार 216 मतदार मतदान करणार आहेत.

सरपंचाची निवड जनतेतून करायची असल्याने निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम जाहीर प्रचारातही दिसून आला. मतदानाच्या 48 तास अगोदर प्रचार थांबवणे बंधनकारक असल्याने रविवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. तर आता खऱ्या अर्थाने छुप्या प्रचाराला सुरवात झाली आहे. थेट जनतेतून सरपंच पद असल्याने सरपंचपदाच्या उमेदवारांनी स्वतःची वेगळी प्रचार यंत्रणा राबवावी लागली आहे. गावात जोरदार प्रचार करण्यात आला. गल्लीबोळातून प्रचाराची वाहने फिरत होती. तसेच जाहीर सभांतून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत होत्या. या प्रचारयुद्धास अखेर पूर्णविराम मिळाला आहे. रविवारी सायंकाळी जाहीर प्रचार थांबला आहे. राजकीय नेतेमंडळींचे या निवडणुकीकडे आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने लक्ष आहे. सरंपचाच्या निवडीकडे विशेष लक्ष आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार सरपंचपदी विराजमान होतो यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असल्याने नेते मंडळीकडून या निवडणुकीतील घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे.

निवडणूकीमध्ये चुरस निर्माण झाली असली तरी यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी उमेदवारांची बैठक घेऊन चर्चा केली आहे. शिवाय बंदोबस्तही लावण्यात आला आहे. सर्वच उमेदवार व कार्यकर्त्यांनी शांततेत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Marathi news pune news manjari grampanchayat