साहित्य संमेलनाकडे प्रकाशकांची पाठ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जानेवारी 2018

पुणे : प्रकाशक आणि साहित्य संमेलनाचे आयोजक यांच्यात एकत्र बैठक झाली असली, तरी बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पुण्यातील बहुतांश प्रकाशकांनी पाठ फिरवली असल्याचे प्रकाशकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाळे नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे. 

पुणे : प्रकाशक आणि साहित्य संमेलनाचे आयोजक यांच्यात एकत्र बैठक झाली असली, तरी बडोदा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे पुण्यातील बहुतांश प्रकाशकांनी पाठ फिरवली असल्याचे प्रकाशकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या गाळे नोंदणीवरून स्पष्ट झाले आहे. 

बडोदा येथे 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनाची तयारी सुरू आहे; पण प्रकाशकांनी बडोद्यात ग्रंथविक्री होणार नाही, याकडे महिनाभरापूर्वीच आयोजकांचे लक्ष वेधून घेतले होते. गाळ्याचे भाडे भरणे, पुस्तके घेऊन जाणे यासाठी लागणारा खर्च संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनातून भरून निघणार नाही, असे गाऱ्हाणे प्रकाशकांनी मांडले होते. या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र साहित्य परिषदेने पुढाकार घेऊन पुण्यातील प्रकाशक आणि संमेलनाच्या आयोजकांची एकत्र बैठक बोलावली होती. 

गाळ्याचे भाडे चार हजार रुपये आहे, ते कमी करावे. शिवाय, गाळ्यावरील कर्मचाऱ्यांची राहण्या-जेवणाची सोय करावी, अशा मागण्या प्रकाशकांनी आयोजकांकडे केल्या होत्या. यामुळे लहान-लहान प्रकाशकांनासुद्धा दिलासा मिळेल, असे आयोजकांना सांगण्यात आले होते. मात्र, या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याचा परिणाम गाळे नोंदणीवर दिसून येत आहे. पुण्यात प्रकाशकांची संख्या जास्त आहे. दरवर्षी पन्नासहून अधिक प्रकाशक संमेलनाला जातात. यंदा 20 डिसेंबर ते 20 जानेवारी या कालावधीत केवळ बारा प्रकाशकांनीच गाळ्यांची नोंदणी केली आहे. नोंदणीची मुदत शनिवारी (ता. 20) संपली. प्रकाशकांच्या अल्प नोंदणीमुळे संमेलनातील ग्रंथ प्रदर्शनाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. 

महाराष्ट्राबाहेर संमेलन होते, तेव्हा आपले 'बिऱ्हाड' तेथे घेऊन जाणे, हे काम प्रकाशकांसाठी खर्चिक असते. त्यातच गाळ्याचे भाडे वाढविणे, इतर सोई-सुविधा उपलब्ध करून न देणे अशा चुका आयोजकांकडून झाल्या आहेत. त्याचा हा परिणाम आहे. या चुका अजूनही आयोजकांना दुरुस्त करता येतील, त्या दुरुस्त झाल्या तर प्रकाशकांची आकडेवारी वाढू शकेल. 
- राजीव बर्वे, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ

Web Title: marathi news Pune News Marathi Sahitya Sammelan