संगीत नाटकांना अच्छे दिन ! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पुणे : मराठी रंगभूमीचे गौरवास्पद वैशिष्ट्य असणाऱ्या संगीत नाटकांना पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त होण्याच्या आशा पल्लवित व्हाव्यात, असे चित्र सध्या व्यावसायिक रंगभूमीवर निर्माण झाले आहे. रविवारी (ता. 4) 'संगीत देवबाभळी', 'संगीत शंकरा' व 'हे बंध रेशमाचे' या तीन संगीत नाटकांचे प्रयोग पुण्यात होत आहेत. या तीन नाटकांपैकी दोन नाटके ताज्या नव्या संहिता असलेली व नुकतेच रंगभूमीवर आलेली नव्या कोऱ्या निर्मितीची आहेत, हे विशेष. 

प्रसाद कांबळींच्या 'भद्रकाली'चे नवे नाटक 'सं. देवबाभळी' हे नाटक आपल्या अनोख्या कथा संकल्पनेने चर्चेत आहे. प्राजक्त देशमुख या युवा लेखक- दिग्दर्शकाच्या या नाटकाचे संगीत दिग्दर्शनही आनंद ओक या युवा संगीतकाराने केले आहे. शुभांगी सदावर्ते व मानसी जोशी ही कलावंतांची टीमही 'फ्रेश' आहे. आनंद भाटेंनी गायिलेल्या संत तुकारामांच्या रचना हेही या नाटकाचे एक आकर्षण. 

अशोक समेळांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या 'सं. शंकरा'साठी प्रा. अशोक बागवेंनी गाणी लिहिली असून, ती नरेंद्र भिडेंनी संगीतबद्ध केली आहेत. चारुदत्त आफळे, गौरी पाटील, अद्वैत केसकर, तेजश्री वैद्य आदी कलाकारांच्या नाटकात भूमिका आहेत. 

रणजित देसाईंचे लेखन, शांता शेळकेंची गीते व जितेंद्र अभिषेकींचे संगीत यामुळे संस्मरणीय झालेल्या 'हे बंध रेशमाचे' या नाटकाचा नवा प्रयोग रवींद्र खरेंनी दिग्दर्शित केला आहे. चारुदत्त आफळे, अस्मिता चिंचाळकर, संजीव मेहेंदळे, कविता टिकेकर आदींच्या भूमिका असलेल्या या प्रयोगाची दिल्लीत या महिन्यात होत असलेल्या आंतरराष्ट्रीय नाट्य ऑलिम्पियाडसाठी निवड झाली आहे. 

'अवघा रंग एकची झाला' या उत्तम यशस्वी ठरलेल्या नाटकानंतर 'नाट्यसंपदे'साठी अनंत पणशीकरांनी रंगमंचावर पुनरुज्जीवित केलेले प्रा. वसंत कानेटकर लिखित 'संगीत मत्स्यगंधा' हे अभिजात संगीत नाटकही पुन्हा एकदा रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. याचेही प्रयोग पुण्यात नियमित होत आहेत.

Web Title: marathi news pune news Marathi theater in Pune