टाळवादनातून करतो नादब्रह्माची सेवा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली टाकळकर या 92 वर्षे वयाच्या टाळवादक संगीतसाधकाला "राज्य सांस्कृतिक कलादान पुरस्कार' व "गानसरस्वती किशोरी आमोणकर साथसंगत पुरस्कार' जाहीर झाला आहे. त्या निमित्तानं नीला शर्मा यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत.... 

प्रश्‍न : टाळवादनात ब्रह्मानंदी टाळी लागण्याच्या अनुभवाबद्दल सांगा. 
माऊली :
मी वारकरी. आजी-आजोबा, आई-वडील वारकरी असल्यानं तेच बाळकडू मिळालं. आठ-नऊ वर्षांचा असल्यापासून वारकऱ्यांबरोबर गाऊ-वाजवू लागलो. माधवबुवा सुकाळे यांच्याकडे जवळपास 10 वर्षे टाळवादन शिकत होतो. पखवाजवादनही शिकलो, पण खरा रमत गेलो तो टाळवादनात. बालगंधर्वांबरोबर साथ करायचो. पंडित भीमसेन जोशींबरोबर तर 40 वर्षे टाळांची साथ केली. त्यांच्यामुळेच जगभर दौरे झाले. या दोघांकडून भक्तिसंगीतातला अथांगपणा समजत गेला आणि टाळवादनातून मला विठाईची सेवा केल्याचं समाधान मिळत राहिलं. 

प्रश्‍न : टाळांची संगत करताना कुठली वैशिष्ट्यं जपावी लागतात ? 
माऊली -
अभंग किंवा भजन सादर करताना, तबल्यावर जो ताल वाजवला जाणार असेल, तो गायक कलावंत मला हळूच सांगतात. मग मी त्याप्रमाणे झपताल, एकताल, धुमाळी, आडा चौताल किंवा दीपचंदीचा ठेका धरतो. भीमसेनजींसाठी हार्मोनिअमवर काळी एकशी जुळणारे टाळ वापरायचो. किशोरीताईंसाठी काळी एक व काळी दोनचे असे दोन्ही वाजवले आहेत. आकारानुसार टाळांचा नाद वेगळा असतो. शिवाय आघातावर बरंच काही अवलंबून असतं. मी भजन, अभंग गायला तसंच पखवाज वाजवायला शिकलो असल्यानं या दोन्हींबरोबर टाळवादनातली गती अन्‌ नादाची तीव्रता कशी कमी-जास्त करायची, हे छान जमून जातं. माझा मुलगा आनंद आणि नातू प्रथमेश यांच्याबरोबर काही शिष्यांनाही मी या खुब्या समजावून सांगतो. 

प्रश्‍न - भीमसेनजींच्या सहवासात काय शिकायला मिळालं ? 
माऊली -
पूर्वी शास्त्रीय संगीताच्या मैफलींमध्ये ख्यालगायन व उपशास्त्रीय संगीतातले प्रकार किंवा मराठी कलावंतांकडून फार तर नाट्यपदं सादर केली जायची. भीमसेनजींमुळे अभंगगायन त्यात आलं आणि बघताबघता ते लोकप्रिय होत गेलं. यामुळे पूर्वी शास्त्रोक्त गाण्याकडे न फिरकणारेसुद्धा मुद्दाम ऐकायला येऊ लागले. भीमसेनजी "तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल' हा अभंग गायचे तेव्हा "ठ' ला "ठ' या अक्षरांचा स्वराविष्कार ते असा काही करायचे की, विठ्ठल समोर उभा ठाकल्यासारखं भासायचं. भीमसेनजींनी असंही सांगितलं की, कुठल्याही कलावंताला लहान समजायचं नाही. नवी पिढी फार सुरेख आणि तयारीनं गाते आहे. या मंडळींना टाळांची संगत करण्यातूनही मला खूप आनंद मिळतो.

Web Title: marathi news pune news mauli takalkar