लैंगिक शिक्षण, मासिक पाळीसारख्या विषयांवर चर्चा होणे गरजेचे - प्रवीण निकम

मिलिंद संगई
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

बारामती : लैंगिक शिक्षण व मासिक पाळीसह वयात येणाऱ्या युवक युवतींच्या विविध प्रश्नांवर घर व सामाजिक पातळीवर मोकळेपणाने चर्चा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोशनी फाऊंडेशनचे प्रवीण निकम यांनी केले.

बारामती : लैंगिक शिक्षण व मासिक पाळीसह वयात येणाऱ्या युवक युवतींच्या विविध प्रश्नांवर घर व सामाजिक पातळीवर मोकळेपणाने चर्चा होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन रोशनी फाऊंडेशनचे प्रवीण निकम यांनी केले.

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया व विद्या प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित प्रतिबिंब अंतर्गत युवा पिढीचे तारुण्यातील प्रश्न या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, विद्या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष अॅड. ए.व्ही. प्रभुणे, सचिव द.रा. उंडे, विश्वस्त अॅड. नीलीमा गुजर, डॉ. राजीव शहा, श्रीकांत सिकची, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, बारामती बँकेचे उपाध्यक्ष अविनाश लगड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

प्रविण निकम म्हणाले, आजही भारतातील पुरोगामी म्हणविणाऱ्या घरातूनही लैंगिक शिक्षण किंवा मासिक पाळी सारख्या विषयांवर मोकळेपणाने बोलले जात नाही, मित्र मैत्रीणींकडून मिळणारे सल्ले व इंटरनेटवरील माहितीच्या आधारेच युवक युवती या विषयाबाबत स्वतःची मते ठरवितात, अनेकदा त्यात गैरसमज अधिक असतात. मासिक पाळी येणे ही नैसर्गिक क्रिया आहे, त्यासाठी पूजेपासून वंचित ठेवण्यासह महिलांवर असंख्य प्रकारची बंधने का घातली जातात, मासिक पाळी येणे ही नैसर्गिक बाब आहे हे समाज आजही का मान्य करत नाही असा सवाल त्यांनी केला. केवळ युवतीच नाही तर युवकांनाही मासिक पाळीसह लैंगिक शिक्षणाची व्यवस्थित व शास्त्रशुध्द माहिती देणे गरजेचे आहे.

जीवनातील काही चुकीच्या गोष्टी टाळायच्या असतील तर लैंगिक शिक्षणाबाबत मोकळेपणाने बोलले पाहिजे वयात येणाऱ्या मुलांना याची माहिती दिली गेली पाहिजे, असे निकम म्हणाले. महिलांवर बंधने घालण्याची गरज नसताना या बाबत गैरसमज वाढून विनाकारण या विषयाला वेगळे वळण दिले जाते, या बाबी बदलण्याची गरज त्यांनी बोलून दाखविली.

विद्यार्थ्यांच्या मनातही उत्सुकता
प्रवीण निकम यांचे विचार ऐकताना विद्यार्थी देखील तल्लीन झाले होते. प्रथमच इतक्या वेगळ्या पध्दतीने या विषयाची माहिती मिळाल्याची प्रतिक्रीया विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमानंतर बोलून दाखविली. युवा पिढीला लैंगिक शिक्षणाबाबत शास्त्रशुध्द माहिती देणे गरजेचे असल्याचे काही विद्यार्थ्यांनी बोलून दाखविले.

Web Title: Marathi news pune news menstrual cycle discussion pravin nikam