मिलिंद एकबोटेंना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

हिंसाचारात मोठे नुकसान 
कोरेगाव भीमा लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्यामुळे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारी रोजी राज्यभरातून हजारो नागरिक कोरेगाव भीमा येथे आले होते. त्या वेळी उसळलेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, काही जण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. हा हिंसाचार एकबोटे यांच्या चिथावणीमुळे झाल्याची तक्रार केली गेली. दरम्यान, एकबोटे यांची शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीही झाली होती.

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचारप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांना पुणे न्यायालयाने 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. 

एकबोटे यांना ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. आज (गुरुवार) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर बुधवारी एकबोटे यांना पोलिसांनी त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. एकबोटेंचे कॉल रेकॉर्ड तसेच वितरित झालेले पत्रके याबाबत पोलिसांना चौकशी करायची आहे, त्यामुळे पोलिसांनी 14 दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र एकबोटेंचा गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग नाही, तसेच कॉल रेकॉर्ड्स मोबाईल कंपन्यांकडूनही मागवता येऊ शकत त्यासाठी इतक्या दिवस पोलिस कोठडीची गरज नाही, असा युक्तिवाद एकबोटे यांच्या वकिलांनी केल्यांनातर अखेर एकबोटेला 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

नगर रस्ता आणि कोरेगाव भीमा येथे 1 जानेवारी रोजी हिंसाचार घडला होता. हा हिंसाचार घडविण्यास चिथावणी दिल्याच्या आरोपाखाली एकबोटे आणि श्री शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे गुरुजी यांच्याविरुद्ध शिक्रापूरसह राज्यात तीन पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदविले गेले. त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ऍट्रॉसिटी), दंगल भडकविणे, खुनाचा प्रयत्न, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आदी कलमानुसार हा गुन्हा नोंदविला गेला आहे. 

या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी एकबोटे यांनी दाखल केलेला अर्ज जिल्हा न्यायालय, उच्च न्यायालयाने फेटाळला होता. त्यानंतर एकबोटे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागितली. सर्वोच्च न्यायालयाने एकबोटे यांच्या अटकेस 14 मार्चपर्यंत स्थगिती दिल्याने त्यांची अटक लांबली होती. या प्रकरणी बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करताच दुपारी बाराच्या सुमारास ग्रामीण पोलिसांनी एकबोटे यांना शिवाजीनगर भागातील रेव्हेन्यू कॉलनीतील निवासस्थानावरून ताब्यात घेतले.

हिंसाचारात मोठे नुकसान 
कोरेगाव भीमा लढाईला 200 वर्षे पूर्ण झाल्यामुळे विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी 1 जानेवारी रोजी राज्यभरातून हजारो नागरिक कोरेगाव भीमा येथे आले होते. त्या वेळी उसळलेल्या हिंसाचारात सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, काही जण जखमी झाले होते. या घटनेचे पडसाद देशात उमटले होते. हा हिंसाचार एकबोटे यांच्या चिथावणीमुळे झाल्याची तक्रार केली गेली. दरम्यान, एकबोटे यांची शिक्रापूर पोलिस ठाण्यात चौकशीही झाली होती.

Web Title: Marathi news Pune news Milind Ekbote police custody Koregaon Bhima riot