दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या कंपनीची वाटचाल पूर्णत्वाच्या दिशेने

रामदास वाडकर
मंगळवार, 9 जानेवारी 2018

दोन वर्षांपूर्वी टाटा पॉवर व ए.एल.सी.ने आंदर मावळातील ४० गावच्या महिलांना संघटित करून सवत:च्या मालकीचा दुधनिर्मिती कारखाना काढण्याचा संकल्प केला, या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले, एक हजार महिला सभासद नोंदणी करण्यासाठी महिला प्रमोटर्स नेमले.

टाकवे बुद्रुक : एक हजार महिलांनी संघटित होऊन काढलेल्या, दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करणाऱ्या कंपनीची वाटचाल पूर्णत्वाच्या दिशेने पाऊल टाकीत आहे, या वर्षाच्या मध्यावर मावळ दूध उत्पादक कंपनीचे दही, दूध, ताक, लोणी, पनीर, श्रीखंड बाजारपेठेत भाव खाऊन जाणार आहे. यासाठी टाटा पाॅवर व ए.एल.सी.कंपनीने या महिलांच्या अंगी बळ उभे केले आहे. कोटी रूपये खर्च करून हा प्रकल्प साकरण्याचा मोठा प्रयत्न सुरू आहे. 

दोन वर्षांपूर्वी टाटा पॉवर व ए.एल.सी.ने आंदर मावळातील ४० गावच्या महिलांना संघटित करून सवत:च्या मालकीचा दुधनिर्मिती कारखाना काढण्याचा संकल्प केला, या अनुषंगाने प्रयत्न सुरू केले, एक हजार महिला सभासद नोंदणी करण्यासाठी महिला प्रमोटर्स नेमले. सर्व सभासद नोंदणी झाल्यावर लोकशाही पद्धतीने महिला कार्यकारी मंडळाची स्थापना झाली, या विश्वस्त मंडळाने अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांची नेमणूक केली. महिलांच्या सहभागाने सुरू होत असलेला राज्यातील हा पहिला प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे. 

सभासद नोंदणी शुल्क आणि बँकेकडून कर्ज काढून मिळणाऱ्या भांडवलावर हा कारखाना उभा राहणार आहे, यासाठी टाटा पॉवर कंपनीकडून मदत होणार आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. सुरूवातीला आंदर मावळातील बोरवलीत कारखाना बांधण्यासाठी जागा खरेदी केली, पण पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने त्यास मंजूरी दिली नाही ,हा परिसर इको सनसेटिव्ह झोन मध्ये येत असल्याने येथे कारखाना बांधता येत नाही, हे लक्षात आल्यावर या जागेत आदर्श गोपालन केले जाणार आहे. 

घरच्या घरी जनावरांना हिरवा चारा मिळवा यासाठी वेगवेगळ्या महिला प्रशिक्षणांतून हे तंत्र महिलांनी आत्मसात केले आहे, अॅजुला,हे त्याचे प्रकार आहे. कारखाना ते ग्राहक असा पशुखाद्य विक्री करून दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजारभावापेक्षा कमी दराने पशू खाद्य उपलब्ध करून देण्यात येत आहे, जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने कंपनीने स्वतःची स्वतंत्र व्यवस्था केली आहे. पहिल्या दोन वार्षिक सर्वसाधारण सभा देखील पार पडल्या आहेत. तिसरी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याच्या आवारात करू असा निर्धार घेऊन महिला राबत आहे.पहिल्या टप्प्यात  सुमारे दहा हजार लिटर दूध प्रतिदिन संकलित करून त्यापासून दुग्धजन्य पदार्थाची निर्मिती करण्याचा व्यवस्थापनाचा मानस आहे. 

या साठी महिलांना कर्ज पुरवठा करून गाई म्हशी खरेदीसाठी मदत केली जाणार आहे, घरच्या घरी गोपैदास केले तर खरेदीसाठी ज्यादा रक्कमेची गरज भासणार नाही, याचाही विचार केला जातो आहे. या सर्व महिला सभासदांना पूर्णपणे प्रशिक्षित करून या व्यवसायात त्यांना उतरविले जाईल,वेगवेगळ्या प्रशिक्षण आणि चर्चासत्रात या मार्गदर्शन होत आहे. महिला देखील मोठ्या उत्साहाने यात सहभागी होत आहे. 
पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाने या कंपनीच्या बांधकामासाठी येथील इंद्रायणी औद्योगिक वसाहतीत परवानगी दिली आहे, लवकरच सर्व महिला सभासदांच्या उपस्थितीत भूमीपूजन कार्यक्रम होईल अशी माहिती टाटा पॉवर व एएलसी कडून देण्यात आली आहे.

Web Title: Marathi news Pune news milk company