स्मार्ट सिटीस्‌चा विकास करणे ही काळाची गरज आहे - राजेंद्र जगताप

जनार्दन दांडगे
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

लोणी काळभोर (पुणे) : देशातील स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, मात्र या सिटी विकसित करताना स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊनच त्याचे नियोजन केल्यास आदर्श शहर लोकांसमोर उभे होईल असे मत स्मार्ट सिटी पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर (पुणे) : देशातील स्मार्ट सिटी विकसित करण्यासाठी केंद्र शासनाने भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे, मात्र या सिटी विकसित करताना स्थानिक लोकांच्या गरजा लक्षात घेऊनच त्याचे नियोजन केल्यास आदर्श शहर लोकांसमोर उभे होईल असे मत स्मार्ट सिटी पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी व्यक्त केले.

लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ मॅनेजमेंट विभागातर्फे आयोजित चौथ्या राष्ट्रीय बांधकाम आणि आत्याधुनिक वाहतूक व्यवस्था नियोजन परिषदेच्या समारोप कार्यक्रमात जगताप बोलत होते. यावेळी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या संचालिका सुनीता कराड उपस्थित होत्या.

यावेळी जगताप म्हणाले, "स्मार्ट सिटीस्‌चा विकास करणे ही काळाची गरज आहे. नागरिकांना शाश्वत विकासांबरोबरच जागतिक स्तरावरील सर्व सोईसुविधा प्रदान करणे हे सरकारचे काम आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन स्मार्ट सिटी विकासाचे नियोजन केले जात आहे. स्मार्ट सिटीचा विकास करताना येथे राहणाऱ्या सर्व घटकांना योग्य तो न्याय देणे आवश्यक आहे. जेष्ठ नागरिकांसाठी सोईसुविधा, युवकांसाठी प्रोत्साहन देणारे केंद्र, शहरातील रस्त्याची पुनर्रचना, 24 बाय 7 पाण्याची व्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, ग्राहकांसाठी तत्काळ सुविधा केंद्र, मल्टी मॅाडेल वाहतूक पार्किंग व्यवस्था, पर्यावरण पूरक विकासावर भर, ड्रेनेजच्या पाण्याचे शुध्दीकरण केंद्र याची रचना करून उभारणी करणे स्मार्ट सिटी विकासात महत्त्वाचे आहे." 

पुण्यासारख्या शहराचा विकास करताना शहरातील सर्व घटकांच्या विकासाचे आव्हान आहे, मात्र त्यासाठी प्रत्येक विभाग आपल्याशी निगडीत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्मार्ट सिटीला टुरिझमची जोड देऊन शहराच्या आर्थिक उत्पन्नात भर घालता येईल असेही जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले.

दरम्यान, कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी पेपर प्रजेंटेशन सादर केले. यामध्ये सांडपाणी व्यवस्थापन मॉडेलसाठी आर्किड कॉलेजच्या अक्षय वारत आणि ऐश्वर्या शिंदे या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले यामध्ये 10 हजार रुपये रोख व पारितोषिकाचा समावेश होता. स्मार्ट वाहतूक व्यवस्थासंबंधी गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचा शेख शमरिन शेख इरफान, अभिजित पाटील यांना पारितोषिक मिळाले. एआयएसएसएमएस सीओईच्या शिवम पांडे याला सर्वात्कृष्ट, गव्हर्मेंट पॉलिटेक्निकचा विद्यार्थी अक्षय शेळके याला प्रथम तर एसएसएमएस कॉलेज ऑफ आर्किेटेक्चरची विद्यार्थीनी शिवानी बावधानकर हिला दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Marathi news pune news MIT smart city development rajendra jagtap