मरगळ झटकून 'दिलसे' काम करण्याची गरज

Raj Thackray
Raj Thackray

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचे वारे आतापासूनच वाहू लागले आहेत. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची यंत्रणा त्यादृष्टीने कामाला लागली आहे. शिवसेनेने या दोन्ही निवडणुका स्वतंत्र लढविणार असल्याची घोषणा करून खळबळ उडवून दिली आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेमके काय सुरू आहे, असा प्रश्‍न अनेकांना पडला असेल; पण पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात येऊन कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार, अशी बातमी झळकली आणि कार्यकर्त्यांना हायसे वाटले.

ठाकरे यांना त्यांच्या व्यापातून पक्षाच्या कार्यालयात येऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधता आला नाही; पण अमित ठाकरे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीसाठीची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे पक्षाच्या कार्यालयातही बऱ्याच दिवसांनी कार्यकर्त्यांची वर्दळ दिली. प्रत्येक प्रभागात पदाधिकारी नेमताना पक्षाची नेमकी ताकद किती उरली आहे, याचा अंदाजही या निमित्ताने पक्षनेत्यांना आला. पुण्यात येत्या काळात पक्षाला उभे राहण्यासाठी बराच मोठा पल्ला गाठावा लागेल, याची जाणीवही त्यांना नक्कीच झाली असणार. 

लोकसभा, विधानसभा आणि वर्षभरापूर्वी झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. राज्यभरातच या पक्षाची स्थिती वाईट झाली. पण त्यानंतर वेळीच सुधारणेसाठी जी पावले टाकावी लागतात तीही कुठे दिसली नाहीत. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांचा मोठा संच असतानाही पक्षाला मरगळ आली. पुणे महापालिकेत 2012च्या निवडणुकीत मनसेला 27 जागांवर विजय मिळला होता. पुणेकरांच्या मोठ्या अपेक्षा या पक्षाकडून असताना त्यांना मतदारांचा विश्‍वास कमावता आला नाही. पुणेकरांच्या प्रश्‍नावर ठोस भूमिका घेऊन लढताना हा पक्ष दिसला नाही. पक्षाच्या नेत्यांचेही पूर्णपणे दुर्लक्ष झाले. त्याचा परिणाम म्हणून पक्षाची महापालिकेतील संख्या 27 वरून दोनवर आली. जे दोन नगरसेवक विजयी झाले, त्यातही त्यांच्या वैयक्तिक कामाचा वाटाच जास्त होता. 

महापालिका निवडणुकीनंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांची संख्याही कमी झाली. युवकांचा मोठा पाठिंबा असणाऱ्या या पक्षाला शहर पातळीवर खंबीर नेतृत्व मिळाले नाही, त्यामुळे पक्षाचा प्रभाव पडण्यासही मर्यादा आल्या. आता पक्षाने पक्षसंघटनेवर भर दिला आहे, ही जमेची बाजू म्हणावी लागेल. पुण्यातील प्रभाग रचना बदलल्याने पक्ष संघटनेच्या रचनेतही बदल केले आहेत. प्रत्येक प्रभागासाठी एक प्रभागाध्यक्ष नियुक्त केला जाणार आहे. दोन प्रभागांवर उपविभाग अध्यक्ष असेल. आठ विभाग अध्यक्ष, चार उपशहराध्यक्ष आणि एक शहराध्यक्ष अशी नवी रचना यापुढे शहरात राहणार आहे. ठाणे आणि मुंबईच्या धर्तीवर ही रचना केली जाणार असून, त्यानिमित्ताने पक्षाला प्रभाग पातळीपर्यंत पदाधिकारी मिळतील अशी अपेक्षा आहे. 

महापालिकेत सध्या वसंत मोरे आणि साईनाथ बाबर विविध विषयांवर लढताना दिसतात. त्यांना पक्ष संघटनेचे पाठबळ मिळणे आवश्‍यक आहे. महापालिका पदाधिकारी आणि पक्षसंघटना यातील समन्वय सध्या मनसेमध्येही दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्यादृष्टीने आतापासून तयारी आवश्‍यक आहे; पण अद्याप पक्षपातळीवर मरगळच दिसते, पक्ष संघटनेच्या फेररचनेत ती दूर होईल, अशी कार्यकर्त्यांना अपेक्षा आहे. एक सक्षम विरोधी पक्षाची पोकळी सध्या पुण्यात 
निर्माण झाली आहे, ती भरून काढण्याची संधी मनसेला आहे. त्यासाठी गरज आहे, ती जिद्दीने काम करण्याची, मरगळ झटकण्याची!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com