'ओबीसी'ने स्वतःची ओळख निर्माण करावी - महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - 'इतर मागास प्रवर्गाने (ओबीसी) नेतृत्व म्हणून स्वीकार केलेल्यांनी आपल्याला आत्तापर्यंत काय दिले, याचा विचार करावा. रडगाण्याची भूमिका सोडून ओबीसी समाजाने दुसऱ्याचा झेंडा हाती घेण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करावी,'' असे आवाहन पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केले.

पुणे - 'इतर मागास प्रवर्गाने (ओबीसी) नेतृत्व म्हणून स्वीकार केलेल्यांनी आपल्याला आत्तापर्यंत काय दिले, याचा विचार करावा. रडगाण्याची भूमिका सोडून ओबीसी समाजाने दुसऱ्याचा झेंडा हाती घेण्यापेक्षा स्वतःची ओळख निर्माण करावी,'' असे आवाहन पशुसंवर्धन-दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे व्यक्त केले.

ओबीसी महासभेतर्फे सावित्रीबाई फुले सभागृहात आयोजित ओबीसी न्याय हक्क व जन जागरण परिषदेत ते बोलत होते. या प्रसंगी आमदार हरिभाऊ राठोड, आमदार रामहरी रूपनवर, कमल ढोले पाटील, विठ्ठल लडकत, राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, महासभेचे अध्यक्ष डॉ. पी. बी. कुंभार, युवराज भुजबळ उपस्थित होते. माजी उपमहापौर आबा बागूल, उद्योजक सुरेश कोते व रंजन गिरमे यांना "ओबीसी समाज भूषण' पुरस्कार; तर कादंबरी रायकर यांना ओबीसी रत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.

जानकर म्हणाले, 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पक्षाच्या माध्यमातून स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. मीदेखील माझ्या पक्षाद्वारे आपले अस्तित्व टिकविले आहे. बंजारा समाजाचे आत्तापर्यंत तीन मुख्यमंत्री झाले; मात्र त्यांनी ओबीसीसाठी काय केले?, याचाही विचार केला पाहिजे. आम्हाला मिळालेल्या थोड्या कालावधीत जेवढे करणे शक्‍य आहे, तेवढे काम आम्ही करत आहोत.'' फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेणाऱ्यांनी आत्तापर्यंत काय दिवे लावले? माझा छोटा पक्ष असूनही मोदी यांच्यासमवेत बैठक घेऊन 300 ओबीसींसाठी संविधानातील संबंधित कलम बदलून घेण्यासाठी प्रयत्न केला,'' असेही त्यांनी सांगितले.

कुंभार म्हणाले, 'महाराष्ट्रातील 450 जातींनी एका छत्राखाली येऊन आपल्यातील एकता दाखवून दिली पाहिजे. एकमेकांची जात सांगण्यापेक्षा "ओबीसी' म्हणूनच पुढे आले पाहिजे.'' सूत्रसंचालन दीपक म्हस्के यांनी केले.

पंकजा मुंडेंनी फिरविली पाठ; जानकर आले, बसले अन्‌ गेलेही!
ओबीसी परिषदेसाठी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे व जानकर यांना आमंत्रित केले होते. मुंडे यांनी याकडे पाठ फिरविली, तर जानकर तब्बल तीन तास उशिरा आले. क्षणभर बसले आणि थेट बोलण्यासाठी उभे राहिले. 13 मिनिटांच्या भाषणात त्यांनी "ओबीसीं'वरच टीकास्त्र सोडले. भरसभेत प्रश्‍न विचारणाऱ्याला प्रतिप्रश्‍न करून जानकर यांनी गप्पही केले आणि चौदाव्या मिनिटाला सभागृहाच्या बाहेर पडले. या प्रकारामुळे मुंडे व जानकरांच्या भेटीसाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्यांचा हिरमोड झाला.

Web Title: marathi news pune news obc identity mahadev jankar