वाहनचालक ओम झाला लेफ्टनंट 

मुबारक अन्सारी 
सोमवार, 5 मार्च 2018

"ओम हा अत्यंत हुशार, प्रेरित होता. त्याला मी फक्त दिशा दिली. त्याच्या यशाबद्दल मला अभिमान वाटतो.'' 
- लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू, प्रशिक्षक 

पुणे : शहरात एका खासगी कंपनीचा वाहनचालक असलेला ओम उत्तम पैठणे सैन्यदलात अधिकारी म्हणून रुजू होणार आहे. काम करीत असतानाच त्याने "संयुक्त लष्करी सेवा' (कम्बाइन्ड डिफेन्स सर्व्हिसेस)ची परीक्षेचा अभ्यास करून ती उत्तीर्ण झाला. सध्या तो चेन्नई येथील "अधिकारी प्रशिक्षण प्रबोधिनी' (ऑफिसर्स ट्रेनिंग ऍकॅडमी) येथे प्रशिक्षण घेत असून, येत्या दहा मार्च रोजी भारतीय सैन्यदलात "लेफ्टनंट' पदावर रुजू होणार आहे. 

वाहनचालक ते लेफ्टनंट या प्रवासाबद्दल बोलताना ओम म्हणाला,""मी मूळचा बीड जिल्ह्यातील लिंबारुई गावचा आहे. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील सारोळा लगत असलेल्या तोंडल गावात स्थायिक झालो. एका कुक्कुटपालन व्यवसायाच्या गाडीवर वडील चालक म्हणून काम करीत होते. वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांना इजा झाल्यामुळे गुडघा प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या, पण त्यातील एकच शस्त्रक्रिया यशस्वी झाली. त्यानंतर पुणे शहरात आल्यापासून ते एका कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करीत आहेत. मी विज्ञान शाखेचे (बीएस्सी) शिक्षण घेत असताना काही विषयांमध्ये नापास झालो होतो, राहिलेल्या विषयांचा अभ्यासदेखील सुरू होता. दरम्यान, घरच्या जबाबदारीमुळे माझा मित्र राहुल भालेराव याच्या गाडीवर चालक म्हणून काम करीत होतो. 

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याकडून मिळाली दिशा 
"मी चालवीत असलेल्या गाडीमध्ये एकदा कर्नल बक्षी (निवृत्त) बसले होते. प्रवासामध्ये त्यांनी माझ्याशी छान गप्पा मारल्या. त्या वेळी त्यांनीच मला "सीडीएस' परीक्षेबद्दल माहिती सांगितली. लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू यांचा पत्ता देऊन त्यांच्याकडे प्रशिक्षण घेण्याचा सल्लाही दिला. त्यानंतर 2016 मध्ये झालेल्या "सीडीएस'च्या परीक्षेमध्ये पहिल्याच प्रयत्नात मी उत्तीर्ण झालो. त्यानंतर भोपाळ येथे "सर्व्हिस सिलेक्‍शन बोर्ड' (एसएसबी)ची परीक्षा उत्तीर्ण होऊन चेन्नईमध्ये "ओटीए'मधून प्रशिक्षण पूर्ण केले. आता मी भारतीय सैन्यदलात "लेफ्टनंट' पदावर रुजू होणार आहे,'' असे ओम याने सांगितले. 

"ओम हा अत्यंत हुशार, प्रेरित होता. त्याला मी फक्त दिशा दिली. त्याच्या यशाबद्दल मला अभिमान वाटतो.'' 
- लेफ्टनंट कर्नल गणेश बाबू, प्रशिक्षक 

Web Title: Marathi news Pune news Om Paithane in army