धोरण पुन्हा ‘पार्किंग’मध्ये

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

शहरातील वाहतूक सुधारण्यासाठी पार्किंग धोरण राबविणे गरजेचे आहे. परंतु अंमलबजावणीआधी संबंधित घटकांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे. पार्किंग धोरण कशा पद्धतीने राबविता येईल, याचेही नियोजन करण्यात येणार आहे. त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल.
- योगेश मुळीक, अध्यक्ष, स्थायी समिती

पुणे - शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याच्या उद्देशाने आखलेले बहुचर्चित पार्किंग धोरण आता पुन्हा लांबणीवर पडले असून, यासंदर्भातील प्रस्ताव एक महिना पुढे ढकलण्याचा निर्णय स्थायी समितीने गुरुवारी घेतला. धोरण आणि त्याची अंमलबजावणी याबाबत सर्व पातळ्यांवर अभ्यास करावा लागणार आहे.

धोरणाबाबतची माहिती सर्व घेउनच ते मंजूर केले जाईल, असे स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांनी सांगितले. दुसरीकडे, नियोजित पार्किंग शुल्कात कपात करण्याच्या मागणीवर महापालिकेतील पदाधिकारी गांभीर्याने विचार करीत आहेत. त्यामुळेच धोरण तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात आले.

काय आहे धोरण
शहरातील विविध रस्त्यांवरील वाहनांचे प्रमाण, तेथील पार्किंगची व्यवस्था याचा विचार करून महापालिकेने पार्किंग धोरण तयार केले आहे. त्यात रस्त्यांची वर्गवारी करून पार्किंगचे शुल्क ठरविण्यात आले आहे. त्यानुसार दुचाकी आणि चारचाकी वाहनचालकांना रस्त्यावर वाहने उभी करण्यासाठी किमान १० ते ४० रुपये शुल्क मोजावे लागणार आहे. या धोरणाला मंजुरी देऊन त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचा आग्रह विविध स्वयंसेवी संस्थांचा आहे. पण वाहनचालकांना माफत दरात पार्किंगची सोय उपलब्ध करून देण्याचा विचार करीत असल्याचे महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून सांगण्यात येत आहे. 

प्रस्ताव तिसऱ्यांदा पुढे ढकलला
या आधी दोनदा पुढे ढकलेला पार्किंग धोरणाचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मांडण्यात आला. तसेच सकारात्मक चर्चा करून धोरण मंजूर केले जाईल, असे स्थायी समितीने बुधवारी स्पष्ट केले होते. मात्र प्रस्तावाचा अभ्यास करूनच तो मंजूर करण्याची भूमिका स्थायी सदस्यांच्या बैठकीत घेण्यात आली. त्यामुळे हा प्रस्ताव एक महिना पुढे ढकलण्यात आला. दरम्यान, महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी धोरण मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. परंतु पक्ष संघटनेतून काही सूचना केल्या जात असल्याने त्यावर निर्णय होत नाही, असेही सांगण्यात आले. 

Web Title: marathi news pune news parking policy