प्रत्येक जिल्ह्यात पारपत्र कार्यालय

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - ‘पारपत्र काढणे (पासपोर्ट) ही उच्चभ्रूंपुरती ‘लक्‍झरी’ राहिलेली नाही, तर सर्वसामान्यांसाठीची गरज बनली आहे; परंतु स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच्या ७० वर्षांत देशात फक्त ९० पारपत्र (पासपोर्ट) कार्यालये सुरू झाली. गेल्या तीन वर्षांत मात्र कार्यालयांची ही संख्या २५०च्या घरात गेली असून, त्यापैकी ६० कार्यान्वित झाली आहेत. भविष्यात प्रत्येक ५० किलोमीटरवर किंवा प्रत्येक जिल्ह्यात पारपत्र कार्यालये स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे,’’ अशी माहिती भारतीय परराष्ट्र सेवेतील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर मुळे यांनी दिली.

गणेश कला क्रीडामंच येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली. मुळे म्हणाले, ‘‘पूर्वी पासपोर्ट काढण्यासाठी गावाकडून शहरात यावे लागत आणि त्यासाठी ५०० किलोमीटरचा प्रवास करावा लागत होता. अनेक हेलपाटे मारल्यानंतर पासपोर्ट मिळत असत. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. पासपोर्ट कार्यालयांची संख्या वाढविली आहे. ज्या भागांमधून अधिक मागणी आहे, परंतु कार्यालये नाहीत, अशा भागांमध्ये पासपोर्ट मेळावे आयोजिण्यात येत आहेत. सध्या दररोज ७० हजार पासपोर्ट जारी करण्यात येत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात पासपोर्ट दिल्यानंतरही देशातील सव्वाशे कोटी नागरिकांपैकी फक्त ८ कोटी नागरिकांकडे पासपोर्ट आहे.’’ 

‘देशाच्या कानाकोपऱ्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असतो. त्यासाठी त्यांना शेकडो किलोमीटर प्रवास करण्याची गरज भासली नाही पाहिजे. त्या दृष्टीने पासपोर्ट कार्यालयांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. सोलापूर, इंदूर, उदयपूर आणि सिलिगुडी येथे मुख्य कार्यालये स्थापन केली आहेत. एकूण २५१ नवीन कार्यालये स्थापन होत असून, त्यापैकी ६० कार्यान्वित झाली आहेत,’’ असे मुळे यांनी सांगितले.

पासपोर्ट मिळण्याची प्रक्रियाही सुलभ करण्यात आली आहे. नागरिकांवरील विश्‍वासाच्या नात्यातून स्व-साक्षांकित अर्ज स्वीकारून पासपोर्ट जारी केले जात आहेत. त्यामुळे कोणत्याही अधिकाऱ्याची सही घेण्यासाठी किंवा व्हेरिफिकेशनच्या प्रक्रियेसाठीचा वेळ वाया न जाता २४ तासांत नागरिकांना पासपोर्ट मिळू लागला आहे.
- ज्ञानेश्‍वर मुळे, ज्येष्ठ अधिकारी, भारतीय परराष्ट्रसेवा 

Web Title: marathi news pune news passport office