दौंड: सहायक पोलिस उप निरीक्षकास अटक; पिस्तूल जप्त

Sanjay Shinde
Sanjay Shinde

दौंड : दौंड शहरात जुगार आणि सावकारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात तीन जणांचा खून करणाऱ्या सहायक पोलिस उप निरीक्षक संजय बळीराम शिंदे (वय ३२) यास नाकाबंदीत अटक करण्यात आली आहे. संजय शिंदे याने राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागारातून २२ जिवंत काडतूसे व एक ९ एमएमचे पिस्तूल घेतले होते. त्यापैकी त्याने एकूण दहा गोळ्या झाडून तिघांचा खून केल्याची माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली. तिघांचा भरदिवसा पोलिसाकडून खून झाल्यानंतर दौंड शहरात अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

संशयित मारेकरी तथा सहायक पोलिस उप निरीक्षक संजय ब. शिंदे हा कोल्हापूर येथील इंडियन रिझर्व्ह बटालियन मध्ये नेमणुकीस असून सध्या तो दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागार विभागात कार्यरत होता. मंगळवारी (ता. १६) राज्य राखीव पोलिस दलाच्या शस्त्रागारातून संजय शिंदे याने २२ जिवंत काडतूसे व एक ९ एमएमचे पिस्तूल घेतले होते. दौंड शहरातील नगर मोरी चौकात संजय शिंदे याची मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास जुगाराच्या पैशांवरून झालेल्या बाचाबाची नंतर संजय शिंदे याने त्याच्याकडील पिस्तूल मधून गोपाल शिंदे व परशुराम पवार (दोघे रा. वडार गल्ली, दौंड) या दोघांवर अगदी जवळून एकूण सात गोळ्या झाडल्या व त्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. त्यानंतर संजय शिंदे याने अनिल विलास जाधव ( वय ३०, रा. चोरमले वस्ती, गोपाळवाडी, ता. दौंड) याच्यावर तीन गोळ्या झाडून त्यास ठार केले. तिघांचा खून केल्यानंतर संजय शिंदे हा त्याच्या सदनिकेत लपल्याची माहिती मिळाल्याने पुणे येथून रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आले होते.

त्याच्याकडे नेमका किती शस्त्रसाठा आहे याचा अंदाज नसल्याने पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरून दौंड - गोपाळवाडी रस्त्यावर राज्य राखीव पोलिस दल गट क्रमांक पाचच्या एकूण पाच तुकड्या, पुणे ग्रामीण पोलिस दलाचे अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यासह अग्निशामक बंब आणि रूग्णवाहिका तयार ठेवल्या होत्या. दरम्यान रेस्क्यू टीमने तो सदनिकेत नसल्याचे स्पष्ट केल्याने आणि संजय शिंदे यास पोलिसांनी सुपे (जि. नगर)येथे ताब्यात घेतल्याचे स्पष्ट झाल्याने तणाव निवळला. 

दौंड पोलिस ठाण्यात पत्रकारांशी बोलताना विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले, ``संजय शिंदे याच्या सांगण्यानुसार त्याने दौंड शहरातील एका अज्ञात व्यक्तीकडून २५ हजार रूपयांचे कर्ज घेतले होते परंतु तो ते परत करू शकला नाही. गोपाल शिंदे याच्याकडून संजय शिंदे याला दहा हजार रूपये येणे होते व त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. परंतु त्यामधून झालेल्या वादातून त्याने गोपाळ व परशुराम यांच्यावर गोळीबार केला. सुपे येथे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर संजय शिंदे याने पोलिसांना दिलेल्या जबाबात अनिल जाधव याने वीस वर्षांपूर्वी संजय शिंदे याच्या आई-वडिलांना मारहाण केली होती व त्याचा सूड उगविण्यासाठी अनिल जाधव याच्यावर गोळ्या झाडल्याचा दावा केला आहे. सदर दाव्याची पडताळणी केली जात आहे. संजय शिंदे यास नाकाबंदी मध्ये ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक ९ एमएम पिस्तूल, बारा काडतुसे आणि एक काडतुसांचे मॅगझीन पोलिसांनी हस्तगत केले आहे. संजय शिंदे हा खुणशी, व्यसनी व बदमाश प्रवृत्तीचा होता व त्याच्याविरूध्द तक्रारी देखील होत्या. त्याने पत्नीला देखील मारहाण केली होती, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिस सर्व शक्यता पडताळून तपास करीत आहेत. ``

दरम्यान तिन्ही मृतांचे शवविच्छेदन पुणे येथे करण्यात आले असून आज (ता. १७) अंत्यविधी केला जाणार आहे. शहरात आज दैनंदिन व्यवहार सुरळित झाले असून शहरातील संवेदनशील भागात राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, एक दंगल नियंत्रण पथकासह अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com