प्रदूषण कमी करण्यासाठी कालबद्ध नियोजन हवे - कुलगुरू डॉ. नितीन करमळकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

पुणे - धोकादायक पातळीवर पोचलेले शहरातील प्रदूषण एका रात्रीत कमी होणार नाही. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध नियोजन करणे ही आता काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

पुणे - धोकादायक पातळीवर पोचलेले शहरातील प्रदूषण एका रात्रीत कमी होणार नाही. त्यासाठी प्राधान्यक्रम ठरवून कालबद्ध नियोजन करणे ही आता काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरण तज्ज्ञ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली. 

शहरातील धूलिकणांचे प्रमाण तब्बल चाळीस टक्‍क्‍यांनी वाढल्याचे वृत्त ‘सकाळ’ने सोमवारी प्रसिद्ध केले. त्यानंतर नागरिकांसह पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञांनी या विषयावर चिंता व्यक्त करत या समस्येतून पुणेकरांना वाचविण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली. प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले पाहिजेत; तसेच दीर्घकालीन उपाययोजनांचाही विचार करण्याची गरज आहे, असे या तज्ज्ञांनी सांगितले. 

डॉ. करमळकर म्हणाले, ‘‘कचरा जाळण्याचे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. खासगी वाहनांची संख्याही दररोज वाढतेच आहे. कचरा गोळा करतानाच करावयाचे वर्गीकरण व त्याचा निचरा होण्यापर्यंतच्या प्रक्रियेत लोकसहभाग खूप महत्त्वाचा आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करायचे असल्यास नागरिकांच्या सोयीचा विचार करून अपारंपरिक ऊर्जा स्रोतांना प्रोत्साहन दिले पाहिजे. सायकलपासून सीएनजीवर चालणारी वाहने आणि इलेिक्‍ट्रक व्हेइकल्स यांना मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन देण्याची गरज आहे.’’

अश्विनी रणजित दरेकर म्हणाल्या, ‘‘पुण्याला स्मार्ट सिटीच्या व्याख्येत बसायचे असेल तर पुणे प्रदूषणमुक्त होणे गरजेचे आहे. हवा, पाणी आणि ध्वनी या तिन्ही आघाड्यांवर आपण शहराला चांगले ठेवण्यासाठी तातडीने पावले उचलली पाहिजेत. वाहनांचे हॉर्न, बांधकामांची धूळ आणि वाहनांचा धूर, नदीत सोडलेले सांडपाणी हे पाहून आपल्या पुढच्या पिढीला आपण काय देत आहोत, या प्रश्‍नाचे उत्तर प्रत्येकाने शोधले पाहिजे. या समस्येतून मार्ग काढण्यासाठी तसेच सुजाण पुणेकरांनी एकत्र येऊन मोठी चळवळ सुरू करणे गरजेचे आहे.

पुणे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोचले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीचे वाटावे, असे शहर म्हणजे नेमके काय, या प्रश्‍नाचे पहिले उत्तर प्रदूषणमुक्त शहर असे आहे. यासाठीच आम्ही एकत्र येऊन, टेकडी पर्यावरण बचाव अभियान अलीकडेच घेतले. टेकडीप्रेमी या कामात एकत्र आलेत ही आनंदाची गोष्ट आहे.’’

रोहिणी दामले म्हणाल्या, ‘‘बाणेर रस्त्यावरील चव्हाणनगर परिसरात सातत्याने कचरा जाळला जातो. त्यातून मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषित होते. त्यामुळे श्‍वास घेण्यासही त्रास होतो.’’

सूक्ष्म धूलिकण म्हणजे काय?
  ‘पीएम १०’ म्हणजे १० मायक्रॉनपर्यंत आकार असलेले धूलिकण. एक मिलिमीटरचा एक हजारावा भाग म्हणजे एक मायक्रॉन.
अतिसूक्ष्म धूलिकण म्हणजे काय?
  ‘पीएम २.५’ याला अतिसूक्ष्म धूलिकण म्हटले जाते. त्यांचा आकार २.५ मायक्रॉनपर्यंत असतो.

Web Title: marathi news pune news pollution management nitin karmalkar