पुणे जिल्ह्यात 1 मार्चपासून प्राथमिक शाळा सकाळची

संतोष शेंडकर
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

सोमेश्वरनगर (पुणे) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 1 मार्चपासून सकाळ सत्रात भरविल्या जातील असा निर्णय आमच्या शिक्षण समितीने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांनी दिली.

सोमेश्वरनगर (पुणे) : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा 1 मार्चपासून सकाळ सत्रात भरविल्या जातील असा निर्णय आमच्या शिक्षण समितीने घेतला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण समितीचे सभापती विवेक वळसे पाटील यांनी दिली.

या निर्णयामुळे जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच मार्चमध्ये शाळा सकाळी भरणार आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा विवेक वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभागृहात पार पडली. शिक्षक संघटनांनी 1 मार्चची मागणी लावून धरली होती. माजी केंद्रीय कृषीमंत्री 
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद नुकतीच पुण्यात पार पडली. यामध्ये वळसे पाटील यांनी समितीच्या बैठकीत याबाबत निर्णय घेऊ असा शब्द दिला होता. त्याअनुषंगाने मंगळवारी समितीने 1 मार्चपासून प्राथमिक शाळा सकाळी भरविण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानंतर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब मारणे, सरचिटणीस खंडेराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षकांच्या शिष्टमंडळाने वळसे पाटील व शिक्षण समितीच्या सदस्यांचा सत्कार करून आभार व्यक्त केले.

या आधी शाळा 1 एप्रिलपासून सकाळ सत्रात भरत होत्या. आताच्या निर्णयामुळे शिक्षण हक्क कायद्याने घालून दिलेल्या शाळांच्या तासिका कमी होऊ नयेत तसेच मुलांचा विहीत अभ्यासक्रमही मागे राहू नये अशी साधी अपेक्षा शिक्षणप्रेमी व्यक्त करत आहेत. कारण सकाळ शाळा साडेसात ते अकरा म्हणजे अवघी साडेतीन तास भरणार आहे! 

'सकाळ' शी बोलताना वळसे पाटील म्हणाले, शिक्षकांची अनेक दिवसापासून ही मागणी होती. तसेच मार्चमध्ये उन्हाची तीव्रता वाढते त्यामुळे मुलांच्या हितासाठी सकाळ शाळा आवश्यक वाटली. तसेच माध्यमिक शाळाही मार्चमध्ये सकाळच्या भरू लागतात. एकाच घरातील माध्यमिकचे मूल सकाळ सत्रात आणि प्राथमिकचे दुपार सत्रात शाळेत जात होते. आता या निर्णयाने एकसूत्रता येईल.

तसेच शाळांना कायद्याने आखून दिलेल्या तासांचे वेळापत्रक कोलमडणार नाही याचीही काळजी घेतली जाणार आहे. बाळासाहेब मारणे म्हणाले, पवारसाहेबांच्या उपस्थितीत दिलेला शब्द वळसे पाटील यांनी पाळला आहे. हा निर्णय विद्यार्थी, पालक व शिक्षक या सर्व घटकांसाठी आनंददायी आहे. जिराईत भागात पाणीटंचाईचे संकट जाणवत होते. सर्वच शाळांमध्ये वीज व पंखे नसल्याने मुले उकाड्याने हैराण होत होती. तसेच खासगी, प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळा समान होतील. 

Web Title: Marathi news pune news primary schools pn jilha parishad from 1 march